लोकसत्ता टीम
वर्धा : रेल्वे प्रवास सर्वात सुखाचा व सुरक्षित अशी भावना ठेवून नागरिक प्रवासाचे हे माध्यम पसंत करतात. प्रवासाचे दरही किफायतशीर समजल्या जात असल्याने रेल्वे प्रवासाला पसंती दिली जाते. आता सर्वसामान्यांच्या म्हटल्या जाणाऱ्या काही गाड्यांना तिकिट दरात सूट देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
भुसावळ-नागपूर तसेच अजनी-अमरावती-अजनी या दोन इंटरसिटी एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘मेमु’ ट्रेन आहेत. त्यांना एक्सप्रेस गाड्याचे दर आकारल्या जात होते. आता या गाड्यांच्या तिकिटासाठी पॅसेंजर गाड्यांचे प्रवासभाडे आकारल्या जाणार आहे. कोवीडनंतर अनेक गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. पॅसेंजर गाड्या अद्याप बंदच आहे. या पार्श्वभूमीवर दर कमी करण्याचा निर्णय झाल्याची माहिती खासदार रामदास तडस यांच्या कार्यालयाने दिली.
आणखी वाचा-नागपूर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार, न्यायालयाने दिली ‘ही’ शिक्षा…
तुळजापूर रेल्वे स्थानक येथे अनेक गाड्यांचा थांबा बंद करण्यात आला होता. त्यासाठी परिसरातील २२ गावांच्या नागरिकांनी लढा उभारला. वेगवेगळ्या मार्गांनी आंदोलन झाले. अखेर इंटरसिटीचा थांबा घेवूनच गावात येईल, अशी हमी तडस यांनी गावकऱ्यांना दिली होती. तुळजापूर रेल्वे स्थानकात म्हणजे दहेगाव गोसावी येथे अजनी-अमरावती-अजनी या इंटरसिटी मेमु एक्सप्रेसने थांबा घेतला. त्यावेळी नागरिकांनी जल्लोष करून स्वागत केले. तडस यांनी वर्धा ते तुळजापूर असा रेल्वेने प्रवास केला. याच वेळी मेमु गाड्यांना पॅसेंजरचे दर लागू होणार असल्याची माहिती देण्यात आली. यामुळे जनतेला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गावाचे सरपंच, रेल रोको कृती समितीचे पदाधिकारी, रेल्वे प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी, रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. यापूर्वी वर्धा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या चांदूर रेल्वे स्थानकावर जबलपूर व शालिमार एक्सप्रेसचा थांबा मिळावा म्हणून मोठे आंदोलन झाले होते. त्याचा पाठपुरावा केल्यानंतर गुरूवारपासून या दोन्ही गाड्यांचे थांबे पूर्ववत झाले आहे.