नागपूर : अपघात कोणाच्याही आयुष्याला कलाटणी देऊन जातात. मेडिकल रुग्णालयातही अशाच एका अपघातातील २६ वर्षीय अनोळखी तरुणाला यवतमाळहून बेशुद्धावस्थेत हलवण्यात आले. यावेळी तो मनोरुग्ण असल्याचे निदर्शनात आले. त्यानंतर त्याच्या घरचा पत्ता काढण्यात यश आल्याने तब्बल सात वर्षांनी तो घरी परतला.
समाजसेवा अधीक्षक कार्यालयाच्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यात १ एप्रिल २०२२ रोजी या तरुणाचा अपघात झाला. त्याला प्रथम प्राथमिक उपचारासाठी यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेले. तेथून रुग्णाला नागपुरातील मेडिकलला हलवले गेले. येथील अस्थिरोग विभागात डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया केली.
रुग्णाच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत गेली. त्यानंतर रुग्णाला मानसोपचार विभागात हलवण्यात आले. येथील डॉक्टरांनी योग्य तो उपचार सुरू केला आणि हळूहळू सुधारणा होत गेली. दरम्यान, समाजसेवा अधीक्षक कार्यालयाने त्याला बोलते केले. रुग्णांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे समाजसेवा विभाग व अजनी पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने या मनोरुग्णाच्या कुटुंबातील व्यक्तीचा शोध घेतला गेला. त्यासाठी पोलीस निरीक्षक शरीन दुर्गे, रुकसार शेख यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. शेवटी रुग्णाच्या नातेवाईकांचा पत्ता मिळाल्यावर त्याचे नातेवाईक रुग्णाला सोबत घरी घेऊन गेले.
हा रुग्ण मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील एका दुर्गम गावातील होता. त्याच्या कुटुंबात त्याची आई-वडील व अजून एक मनोरुग्ण असलेला लहान भाऊ आहे. वडील शेतमजुरी करून मनोरुग्ण असलेल्या आपत्यांचा सांभाळ करतात. रुग्णांचे वडील राधे इवनाती सांगतात की, बालकिशन हा २०१४ साली मनोरुग्ण असल्यामुळे एका रात्री घरून निघून गेला. आम्ही खूप शोधा-शोध केली, जवळपासच्या गावात, नातलगात विचारणा केली पण बालकिशनचा काही पत्ता लागला नाही. त्याबाबत पोलिसांत तक्रारही दिली होती. आता मुलगा सापडल्याने तातडीने मेडिकलला आलो आहे. त्याला आता घरी घेत असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले.