भंडारा : शहरालगतच्या गणेशपूर ग्रामपंचायत हद्दीतील कोरंभी मार्गावर एका ४७ वर्षीय मनोरुग्ण महिलेवर बलात्कार करून तिला रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याची घटना घडली आहे.
ही घटना रविवारी सायंकाळी घडली. दोन दिवस उलटूनही आरोपीचा शोध लागला नाही. महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा – वर्धा : पावसाचा कहर; ७५ जनावरे दगावली, फळबागा उद्ध्वस्त
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी चार वाजता गणेशपूर गावातील काही शेतकऱ्यांना गणेशपूर ते कोरंभीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या खाली एक महिला पडलेली दिसली. या भागात भंडारा शहरासाठी वैनगंगा नदी संरक्षण भिंतीच्या बंधाऱ्याचे काम सुरू झाले आहे. ईसी बंधारा ते पंप हाऊसकडे जाताना पायथ्याशी महिला निर्वस्त्र अवस्थेत दिसताच एका वाटसरूने पोलीस पाटील व जिल्हा परिषद सदस्यांना याबाबत माहिती दिली.
जि.प. सदस्याने भंडारा शहर पोलीस ठाण्यात फोन करूनही प्रतिसाद न मिळाल्याने अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत कातकाडे यांना फोनवरून माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ महिलेला रविवारी रात्री नऊ वाजता जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
हेही वाचा – वर्धा : पावसामुळे कांदा सडला; कोठारात पाणी शिरल्याने शेतकरी हवालदिल
गणेशपूर येथील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला गणेशपूर येथील एका कुटुंबातील सदस्य असूनही घराबाहेर राहत होती. ती अनेकदा परिसरात फिरताना दिसायची. गणेशपूर मार्केट आणि ग्रामपंचायत चाळीजवळ ती झोपायची. शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासून ती गावकऱ्यांना दिसली नाही, त्यानंतर शनिवारी तिच्या कुटुंबीयांनी शहर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवली.
रुग्णालयात रविवारी तिची भेट घेतल्यानंतर मंगळवारी ग्रामपंचायत महिला सरपंच, पंचायत समिती महिला सदस्य व जिल्हा परिषद सदस्यांनी एसपी लोहित मतानी यांची भेट घेऊन हे प्रकरण प्राधान्याने सोडविण्याची मागणी केली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत कातकाडे यांनी सांगितले की, अज्ञाताविरुद्ध कलम ३७६ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू आहे.