सोनेगाव पोलीस ठाणे हद्दीत अंमली पदार्थविरोधी पथकाने सापळा रचून मोठ्या शिताफीने २ कोटी रुपये किमतीचे मेफेड्रॉन ड्रग्ज जप्त केले. यावेळी दोन तस्करांनाही अटक केली गेली. या कारवाईमुळे मादक पदार्थ व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.कुणाल गोविंद गभणे (१८) आणि गौरव संजय कालेश्वरराव (२२) दोन्ही रा. प्रेमनगर शांतीनगर, अशी आरोपींची नावे आहेत.
हेही वाचा- पोलिसांना केवळ अडीचशे रुपये ‘तंदुरुस्ती’ भत्ता!, १९८५ पासून रकमेत बदल नाहीच
दोन्ही आरोपी दुचाकीवर जात होते. गुप्त माहितीवरून पोलिसांनी त्यांना पकडले. दोघांकडे चार झिप्लॉकची पाकिटे आढळली. त्यात १ किलो ९११ ग्रॅम एमडी पावडर आढळली. पावडरची किंमत १ कोटी ९१ लाख १० हजार रुपये सांगितली जात आहे. याशिवाय पोलिसांनी ३ मोबाईल, मोपेड आणि ५ हजार रुपये जप्त केले. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि उपायुक्त मुम्मका सुदर्शन यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक मनोज सिडाम, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे आणि इतरांनी केली.