नागपूर : राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असून नागपूरच्या वैष्णवी हरिभाऊ बावस्कर यांनी मुलींमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. पालघरच्या अमित मोतीराम भोये यांनी अनुसूचित जमाती प्रवर्गातून चौथा क्रमांक मिळविला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून २०२३ साली गट अ आणि गट ब दर्जाच्या ३०३ पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. त्याची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. ही यादी तात्पुरत्या स्वरूपाची आहे. उमेदवारांना लवकरच पदांचे पसंतीक्रम ऑनलाईन सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. विविध न्यायालयात, न्यायधिकरणात दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणांवरील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. वैद्याकीय अहवाल विचारात घेऊन उमेदवारांना लवकरच पदांचे पसंतीक्रम ऑनलाईन सादर करण्याची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. वैष्णवी बावस्कर यांची सहा महिन्यांपूर्वी मंत्रालयातील गृह विभागात सहाय्यक कक्ष अधिकारी पदावर निवड झाली होती. गुरुवारी जाहीर झालेल्या एमपीएससी परीक्षेतही त्यांनी बाजी मारली असून आता त्यांची उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली आहे.
हेही वाचा >>>राज्यातील पहिला तरंगता सौरऊर्जा प्रकल्प आर्वीत साकारणार
आर्थिक परिस्थितीशी झगडून यश
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीशी संघर्ष करून वैष्णवी यांनी हे यश मिळवल्याचे त्यांचे मार्गदर्शक विशाल नागपुरे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. २०१९ ला त्यांच्या वडिलांचे छत्र हरवले. आई एका खासगी रुग्णालयात कामाला होती. वैष्णवी यांची उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाल्याने त्यांच्या कठोर परिश्रमाचे चीज झाले आहे.