लोकसत्ता टीम

नागपूर : राज्यात विदर्भात उन्हाचा चटका वाढतच चालला असताना वातावरणात आता टोकाचा बदल घडून येत आहे. विदर्भातील जवळजवळ सर्वच शहरांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक आहे. तर काही शहरांमध्ये तापमान सातत्याने ४२ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक आहे.

राज्यात सर्वत्रच तापमान चढलेले असताना आणि विशेषकरून विदर्भात तापमानाचा उच्चांककायम असताना हवामान खात्याने पुण्यासह राज्यातील नऊ जिल्ह्यांना पावसाचा “येलो अलर्ट” दिला आहे. या नऊ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीटीची ही शक्यता वर्तविण्यात आली आहे . एक एप्रिल ते चार एप्रिल दरम्यान संपूर्ण राज्याला अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने ३१ मार्चला मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला होता. दरम्यान, हवामान खात्याने कोकणातही पावसाचा इशारा दिला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात आणि विशेषकरून विदर्भात उन्हाचा तडाखा वाढला असताना आजपासून राज्यभरातच अवकाळी पावसाला सुरुवात होणारआहे. तर काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीचाही इशारा देण्यात आला आहे. आज एक एप्रिलला पुणे, अहिल्यानगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव याठिकाणी “ऑरेंज अलर्ट” देण्यात आला आहे. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर ,सांगली, सातारा, नंदुरबार ,धुळे, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती याठिकाणी “येलो अलर्ट” देण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यात सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद विदर्भात होत आहे. दरवर्षीच विदर्भात तापमानाची नवनवे उच्चाक नोंदवले जातात. यावर्षी फेब्रुवारीच्या मध्यान्हपासूनच तापायला लागले आहे. मार्च महिना संपायचा असतानाच उष्णतेची लाट येऊन गेली आहे. चंद्रपूर येथे सर्वाधिक ४२.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. संपूर्ण विदर्भात पारा वाढलेला आहे. मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातही प्रचंड रखरख वाढली आहे. अशातच आता अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आल्याने उकाड्यात आणखी वाढ होणार आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती आहे. तर आरोग्यावर देखील त्याचे परिणाम होण्याची शक्यता आहे.