लोकसत्ता टीम

नागपूर : मोसमी पावसाने गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील बराचसा भाग व्यापला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाने राज्यात प्रवेश केला होता, पण त्यानंतर मोसमी पावसाची वाटचाल मंदावली होती. आता तो पुन्हा सक्रिय झाला असून आज, २२ जूनपासून राज्यातील पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. आज कोकणात विजांच्या कडकडाटासह मुसळधार तर दक्षिण कोकणात अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याठिकाणी पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. राजधानीतही गेल्या दोन दिवसांपासून पाऊस आहे.

आणखी वाचा-यवतमाळ : धक्कादायक! पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपविले, मृतदेह रेल्वे रुळावर फेकला

दरम्यान हवामान खात्याने कोकणासह मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात आज २२ जूनला पावसाचा ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. येथे मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ११ व १२ जूनला पश्चिम विदर्भात मोसमी पाऊस दाखल झाला, पण पूर्व विदर्भ आणि नागपूर मात्र कोरडेच होते. यंदा काही दिवसांच्या विलंबाने का होईना मोसमी पाऊस विदर्भात दाखल झाला.

दरम्यान, विजांच्या कडकडाटासह विदर्भात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पूर्व विदर्भातील नागपूरसह गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली मोसमी पाऊस दाखल झाला असून येत्या काही तासात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. विदर्भाप्रमाणेच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात देखील आज वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

आणखी वाचा-सुवर्णवार्ता! सोन्याच्या दरात २४ तासांत मोठी घसरण; ‘हे’ आहेत आजचे दर…

राज्यात जवळजवळ दोन आठवडे मोसमी पावसाची गती मंदावली होती. मात्र, आता पुन्हा मोसमी पावसाने जोर पकडला आहे. मोसमी पावसाने राज्यात दमदार पुनरागमन केले आहे. हवामान खात्याने आजही राज्यातील अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. आजपासून सर्वच भागात पावसाचा जोर वाढणार असल्याचेही सांगितले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर विदर्भात देखील आज विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. या काळात राज्यात ताशी ५० ते ६० किलोमीटरच्या वेगाने वारे वाहतील असा अंदाज आहे.