गेल्या काही वर्षांपासून मंदीच्या सावटाखाली असलेल्या गृहबांधणी क्षेत्राला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या मेट्रो रेल्वे विस्तारीकरणाच्या घोषणेमुळे चालना मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सध्या नागपूरचा मेट्रो रेल्वे प्रकल्प प्रकाशझोतात आहे, सर्वाच्या नजरा हा प्रकल्प केव्हा सुरू होणार याकडे लागल्या असून या प्रकल्पाचे काही टप्प्यातील कामेही गतीने सुरू आहे. या प्रकल्पाचा शहराच्या औद्योगिकरणासह इतरही क्षेत्राला लाभ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारही वाढण्याची शक्यता आहे. या पाश्र्वभूमीवर गेल्या रविवारी गडकरी आणि फडणवीस यांनी नागपुरात एका कार्यक्रमात मेट्रो रेल्वेच्या विस्तारीकरणाची घोषणा केली आहे. कळमेश्वर आणि हिंगण्यापर्यंत मेट्रो धावेल, असे त्यांनी सांगितले. या घोषणेमुळे बांधकाम क्षेत्राला ‘बुस्ट’ मिळेल या दिशेने पाहिले जात आहे.
नागपुरात सध्या बांधकाम व्यवसायात मंदी असल्याने या क्षेत्रात झालेल्या हजारो कोटींच्या गुंतवणुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जमिनीचे, फ्लॅटचे दर दरवर्षी वाढत असले तरी त्याला खरेदीदार नसल्याने बांधकाम व्यावसायिक अडचणीत सापडले आहे. बांधकाम पूर्ण झालेले हजारो फ्लॅट्स रिकामे पडून आहेत. घरांचे दर कमी व्हावे यासाठी सरकारी पातळीवरून प्रयत्न सुरू असले तरी प्रत्यक्षात त्याचे परिणाम अद्याप दिसून आले नाही.
हिंगणा आणि कळमेश्वर या भागात एमआयडीसी आहे. सध्या येथील परिस्थिती समाधानकारक नसली तरी भविष्यात सरकारच्या ‘मेक इन’च्या घोषणेमुळे या भागात उद्योग येऊ शकतात. अशा परिस्थितीत येथे दळणवळणाची साधणे पुरेशी असणे आवश्यक आहे. सध्या शहर बस या भागात धावते, परंतु त्या पुरेशा नाहीत. एमआयडीसीचा भाग असल्याने बांधकाम क्षेत्राला या भागात फारसा वाव नाही, त्यामुळे शहरातील इतर भागाच्या तुलनेत येथे कोणी जायला तयार नाही, मेट्रो रेल्वे झाल्यास त्यासाठी लागणारी जागा आणि आजूबाजूंच्या परिसराचा विकास झाल्यास येथे मोठय़ा निवासी वसाहतींची मागणी वाढू शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बांधकाम क्षेत्रातील मंदी घालविण्यासाठी या घोषणेचा सकारात्मक परिणाम पुढच्या काळात दिसून येऊ शकतो. या भागातून मेट्रो गेल्यास दळणवळणाची सोय सुलभ होईल व त्यामुळे मोठय़ा प्रमाणात लोक या भागात घरे घेण्यास तयार होतील.
दरम्यान, काहींच्या मते केवळ बांधकाम व्यावसायिकांना खुश करण्यासाठी ही घोषणा आहे. सध्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्प पूर्ण होण्यास तीन वर्षांचा वेळ आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावरच त्याचे यश-अपयश लक्षात येईल. यापूर्वी मिहानच्या निमित्ताने फुगविण्यात आलेला रिअल इस्टेटचा फुगा केव्हाच फुटला आहे. मेट्रोबाबतही असे होणार नाही याची आताच खात्री देता येत नाही. मेट्रो प्रकल्पासाठी लागणारे विदेशी बँकांचे अर्थसहाय्य अद्याप मिळाले नाही. मेट्रो धावण्यापूर्वीच तिच्या विस्तारीकरणाची घोषणा करून काय साध्य होणार हे आताच सांगणे कठीण असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
बांधकाम क्षेत्राला फायदा होईल
हिंगणा आणि कळमेश्वर भागात एमआयडीसी आहेत. तेथे विविध उद्योग सुरू झाल्यास मोठय़ा प्रमाणात रोजगार वाढेल, मेट्रोमुळे दळणवळणाचे साधन उपलब्ध होईल, यामुळे त्या भागात काम करणाऱ्यांना त्याच भागात घरांची गरज निर्माण होईल, यामुळे बांधकाम व्यवसायाला काही प्रमाणात का होईना चालना मिळेल.
–सुरेश सरोदे, अध्यक्ष क्रीडाई