महामेट्रोचे प्रकल्प संचालक महेश कुमार यांची माहिती
सध्याच्या स्थितीत मेट्रो रेल्वेचे वर्धा मार्गावरील खापरी ते सीताबर्डी या मार्गाचे काम ९८ टक्के काम पूर्ण झाले आहे. २६ फेब्रुवारीपर्यंत उर्वरित कामही पूर्ण होणारअसून हा मार्ग मेट्रो सुरू होण्यासाठी सज्ज होणार आहे.
महामेट्रोचे प्रकल्प संचालक महेश कुमार यांनी मंगळवारी बर्डीतील मेट्रो जंक्शन स्थानकाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान पत्रकारांना दिली. या महिन्याच्या अखेपर्यंत खापरी ते बर्डी या मार्गावरून मेट्रो सुरू करण्याचा महामेट्रोचा प्रयत्न असून त्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. कामाच्या पूर्णतेबाबत अजूनही शंका घेतली जात आहे. या पाश्र्वभूमीवर मंगळवारी महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी बर्डी जंक्शनच्या कामाची माहिती दिली व २६ फेब्रुवारीपर्यंत बर्डी-खापरी मार्ग मेट्रो धावण्यासाठी सज्ज असेल असा विश्वास व्यक्त केला.
बर्डीचे स्थानक हे शहराचे आकर्षण केंद्र ठरावे इतके आकर्षक होणार आहे. येथे शहराच्या चाहरी बाजूंनी धावणाऱ्या मेट्रो एकत्र येतील. एकूण पाच माळ्यांची ही इमारत असून येथे प्रवाशांना इतरही सोयी व सुविधा उपलब्ध असेल.
मेट्रो रिच-१ म्हणजे बर्डी ते खापरी या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या मार्गाचे ९८ टक्के काम झाले असून १४ तारखेला आरडीएसओ व त्यानंतर पुढच्या आठवडय़ात रेल्वे सुरक्षा आयुक्तांची चमू चाचणीसाठी येणार आहे. यानंतरच मेट्रोचे संचालन सुरू होईल, असे महेशकुमार म्हणाले.
४०० मीटरचा ‘वॉक वे’
रीच-३ म्हणजे हिंगण्याकडे जाणाऱ्या मार्गावर तयार करण्यात येणाऱ्या वॉक-वेच्या धर्तीवर बर्डी ते खापरी मार्गाच्या खाली ४०० मीटरचा ‘वॉक-वे’ तयार केला जाणार आहे. तो मेट्रोच्या इमारतीपर्यंत असेल. त्याचप्रमाणे इंटरचेंज स्थानकाला अधिक आकर्षित करण्यासाठी इमारतीच्या चारही दिशांना पदपथ आणि सायकल ट्रॅक तयार करण्यात येणार आहे.
आकर्षक बर्डी स्थानक
बर्डी स्थित मुंजे चौकातील मेट्रोच्या इंटरचेंज स्थानकावरील दुसऱ्या माळ्यावर खापरीहून येणारी आणि कामठीकडून येणारा मार्ग जोडण्यात येणार आहे. जमिनीपासून २६ मीटर उंचावर हिंगण्याकडे जाणारा मार्ग असेल. त्याला हिंगण्याहून येणारा आणि इतवारीकडे जाणरा मार्ग जोडण्यात आला आहे. हे दोन्ही मार्ग एकाखाली एक असेल. इमारतीत मेट्रोला नियंत्रित करणारा कक्ष असेल.