नागपूर : शहरांतर्गत सार्वजनिक वाहतुकीसाठी मेट्रो रेल्वे सुरू करण्यात आली आहे. नागपूर शहरालगतच्या छोटय़ा शहरांना जोडणारा ब्रॉडगेज मेट्रोचाही प्रस्ताव असून आता प्रायोगिक तत्त्वावर नाशिकनंतर नागपुरातही नियो मेट्रो सुरू करण्याचे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. अशाप्रकारचा प्रयोग करणारे नागपूर हे देशातील पहिले शहर ठरावे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेट्रो दुसऱ्या टप्प्यातील बहुतांश मेट्रो रेल्वेचे डबे पहिल्या टप्प्याप्रमाणे असतील आणि ‘मेट्रो निओ’ डबे ‘अत्यंत मर्यादित संख्येत’ पण देशी बनावटीचे असतील. नियो मेट्रो म्हणजे रबरी टायरवर धावणारी मेट्रो. हा एक नाविन्यपूर्ण आणि अग्रगण्य मास रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टम आहे. त्यांची ही घोषणा नागपूरसाठी आनंददायी आहे.

हेही वाचा >>> नागपूर – हैदराबाद प्रवास साडेतीन तासात ; नितीन गडकरींकडून नवीन प्रकल्पाची घोषणा

‘मेट्रो निओ’ बाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी या गाडीचे  सर्व घटक देशी बनावटीचे (मेड इन इंडिया) राहतील याची खात्री करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे संपूर्ण प्रकल्पाच्या खर्चातही लक्षणीय घट होईल,  असे फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशी झालेल्या चर्चेचीही माहिती दिली.

नागपूरमध्ये दहा हजार कोटी खर्च करून शहरांतर्गत सार्वजनिक वाहतुकीसाठी मेट्रो प्रकल्पाची उभारणी ९० टक्के पूर्ण झाली आहे. बर्डी ते खापरी आणि बर्डी ते हिंगणा या दोन मार्गावर मेट्रोची सेवा सुरू झाली असून कामठी आणि पारडी मार्गावरचे काम पूर्ण झाले असून फक्त उद्घाटनाची प्रतीक्षा आहे. हे दोन मार्ग सुरू झाल्यावर शहराच्या चारही कोपऱ्यांना मेट्रो सेवेने जोडले जाणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात ब्रॉडगेज मेट्रोचा प्रस्ताव आहे. रेल्वेच्या रुळावरून धावणारी ही मेट्रोगाडी असेल. या माध्यमातून नागपूर शहर परिसरातील १०० किलोमीटर परिसरातील छोटय़ा शहरांना जोडण्याचा मानस आहे. महामेट्रोच्या माध्यमातून ही सेवा देण्यात येणार आहे. केंद्राकडे हा प्रस्ताव सध्या प्रलंबित आहे. यासोबतच बुटीबोरीपर्यंत मेट्रो सेवा वाढवण्यात येणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Metro neo pilot project likely in nagpur after nashik says devendra fadnavis zws