लोकसत्ता टीम
नागपूर: हा प्रसंग आहे एका सतर्क मेट्रो प्रवाशाचा, ज्याने वेळेत योग्य निर्णय घेतला आणि डिजिटल फसवणुकीपासून स्वतःला वाचवले. सायबर फसवणूक आणि स्पॅम कॉलच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. दररोज अशा असंख्य घटना घडत असून, कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली जात आहे. डिजिटल अटक, ओटीपी मागणे ही सायबर गुन्हेगारांची नवीन कार्यपद्धती झाली आहे.
या वाढत्या फसवणुकीच्या घटना इतक्या चिंताजनक आहेत की, भारतीय रिझर्व्ह बँकेने लोकांना सावध करणाऱ्या जाहिरातीसुद्धा प्रसिद्ध केल्या आहेत. या घटनेतही एक स्पॅम कॉल, जो मोठ्या संकटाला कारणीभूत ठरू शकला असता, तो सतर्क मेट्रो प्रवाशाने वेळेत ओळखला आणि अधिकाऱ्यांना कळवल्याने पोलिसांनी तत्काळ कारवाई केली.
ही घटना छत्रपती चौक मेट्रो स्थानकावर घडली. प्लॅटफॉर्मवर पुढील मेट्रोची वाट पाहत असताना, एका व्यक्तीने दुसऱ्या प्रवाशाला मदतीची विनंती केली. प्रवाशाने सांगितले की तो कॉटन मार्केट चौक मेट्रो स्थानकावरून छत्रपती चौक मेट्रो स्थानकापर्यंत प्रवास करत होता आणि त्याने आपली तिकीट हरवली असे सांगितले. त्याच्याकडे रोख रक्कम नाही, म्हणून मित्राला पैसे ट्रान्सफर करण्यासाठी कॉल करणे आवश्यक आहे. त्याने दुसऱ्या प्रवाशाच्या मोबाइलवरून कॉल करण्याची विनंती केली आणि सांगितले की फक्त रु. ३०आवश्यक आहेत. दुसऱ्या प्रवाशाने त्याला ३० रुपये देऊ केले, पण त्या व्यक्तीने पैसे घेण्यास नकार दिला आणि फक्त कॉल करण्यावरच भर दिला त्यामुळे त्याने आपला मोबाइल दिला.
त्या व्यक्तीने एक नंबर डायल केला, पण योगायोगाने प्रवाशाने फोनच्या स्क्रीनकडे पाहिले आणि त्याला काहीतरी संशयास्पद वाटले. स्क्रीनवर स्पॅम कॉलचा इशारा दिसत होता, ज्यामुळे त्याला त्वरित संशय आला. त्याने लगेचच फोन हिसकावून घेतला, कॉल थांबवला आणि मेट्रो स्थानकाच्या नियंत्रकाला ही बाब कळवली. मेट्रो अधिकाऱ्यांनीही त्वरित हालचाल केली आणि वरिष्ठ आणि सुरक्षा अधिकाऱ्यांना माहिती दिली. तपासादरम्यान, त्या व्यक्तीच्या बॅगेत २५० रुपये सापडले. यामुळे मेट्रो अधिकाऱ्यांचा संशय बळावला.मेट्रो अधिकाऱ्यांनी प्रतापनगर पोलीस ठाण्याला माहिती दिली. त्यानंतर पोलिसांचे पथक तातडीने मेट्रो स्थानकावर पोहोचले आणि दोन्ही व्यक्तींना पुढील चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेले.