खुद्द पंतप्रधानच उद्घाटनाला येणार; स्वदेशी समर्थकांच्या आंदोलनाला धक्का

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित स्वदेशी जागरण मंच एकीकडे चिनी वस्तूंवर बंदी घालावी म्हणून देशभर आंदोलन करीत आहे, तर दुसरीकडे संघाच्याच मुख्यालयात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी चिनी बनावटीच्या मेट्रोला हिरवी झेंडी दाखवणार आहेत. संघाशी संबंधित संघटना आणि सरकार यांच्या परस्पर विरोधी भूमिकांची सध्या स्थानिक राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

शहरातील मेट्रोसेवेच्या बर्डी ते हिंगणा या दुसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनासाठी सात सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरमध्ये येत आहेत. त्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. ज्या मेट्रोला मोदी हिरवी  झेंडी दाखवणार आहेत त्याचे डबे चीनमधील ‘दालीयान’ येथील कारखान्यात तयार करण्यात आले असून ते २५ ऑगस्टलाच समुद्र व रस्ते मार्गाचा प्रवास करून  नागपुरात दाखल झाले. ते भारतीय बनावटीच्या मेट्रो कोचेसपेक्षा कसे अधिक टिकाऊ, सुरक्षित आणि किफायती आहेत, हे महामेट्रोकडून पटवून दिले जात आहे. या प्रकल्पात केंद्राचीही भागीदारी असल्याने चिनी वस्तूंबाबत सरकारची भूमिका सकारात्मक आहे, हे यातून स्पष्ट होते. दुसरीकडे स्वदेशी जागरणमंचचा विदेशी वस्तूंना विरोध सर्वपरिचित आहे. मात्र अलीकडेच त्यांनी चिनी वस्तूंवर बंदी घालण्यासाठी देशभर आंदोलन केले. कारण चीनने अनुच्छेद ३७० रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा विरोध केला होता. चीनला धढा शिकवावा म्हणून हे आंदोलन होते. या पाश्र्वभूमीवर मोदी यांनी नागपुरात येऊन चिनी बनावटीच्या मेट्रोचे उद्घाटन करणे मंचच्या व पर्यायाने संघाच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. यासंदर्भात मंचचे राष्ट्रीय परिषदेचे सदस्य धनंजय भिडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ‘‘ दोन वर्षांपूर्वीच आम्ही चिनी बनावटीच्या मेट्रोला विरोध केला होता. सरकारला एकदम जरी काही करता येत नसेल तर त्यांनी हळूहळू तरी स्वदेशीकडे वळावे. कारण त्याशिवाय पर्याय नाही’’. ‘‘मुळात मेट्रो हवीच कशाला?  मेट्रो उभारणीसाठी मोठय़ा प्रमाणात सिमेंट आणि पाणी लागते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही निसर्गाशी जवळीक साधणारी असावी, असा सल्ला त्यांनी दिला.

सुभाषनगर ते बर्डी दरम्यान पंतप्रधानांचा प्रवास

पंतप्रधान नरेंद्र मोदी ७ सप्टेंबरला सायंकाळी नागपूर दौऱ्यावर आहेत. या दरम्यान ते मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन करतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ते सुभाषनगर ते बर्डी या दरम्यान मेट्रोने प्रवास करतील व तेथून ते मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल येथे जाहीर सभेसाठी जातील. त्यामुळे महामेट्रोने सुभाषनगर आणि बर्डी या दोन्ही स्थानकाच्या सौंदर्यीकरणासाठी व तेथील सुसज्जतेसाठी लक्ष केंद्रित केले आहे.

मेट्रो आयुक्तांकडून पाहणी

बर्डी ते लोकमान्य नगर या मार्गाची आज मंगळवारी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) जनककुमार गर्ग यांनी तपासणी केली. तीन दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या चार सदस्यीय मेट्रो सुरक्षा आयुक्तांच्या चमूने पहिल्या दिवशी हिंगणा डेपोतील कोचेस, सिग्नलिंगसह इतरही उपकरणांची पाहणी केली. संपूर्ण दिवस त्यांनी पाहणीत घालवला. अधिकाऱ्यांशी चर्चा केली. रेल्वे गाडीचा आकस्मिक दरवाजा व तेथील सुरक्षा उपकरणांची माहिती घेतली. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्याशीही त्यांनी चर्चा केली. बुधवारी काही मेट्रोस्थानकांची पाहणी करण्यात येणार आहे. या दौऱ्यात आयुक्तांच्या चमूतील सदस्य के.एल. पुर्थी, विवेक वाजपेयी आणि ऋषभ कुमार सहभागी होते.