बर्डी-खापरी, लोकमान्य नगर-सुभाषनगर; महामेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकांची ग्वाही

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : बहुप्रतिक्षित नागपूर मेट्रो खापरी ते बर्डी (१९ किमी.)आणि लोकमान्यनगर ते सुभाषनगर (१३ किमी) या मार्गावरून धावण्यास  फेब्रुवारी अखेपर्यंत  सज्ज होणार आहे. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी आज पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.

लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी पहिल्या टप्प्यातील मेट्रो सुरू करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. खापरी ते बर्डी आणि लोकमान्यनगर ते सुभाषनगर या मार्गावरील काही स्थानकांची आणि इतर कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे इतक्या कमी अवधीत म्हणजे मार्चपूर्वी मेट्रो सुरू होण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. या पाश्र्वभूमीवर गुरुवारी महामेट्रोने मेट्रोच्या स्थानकाची पाहणी व उर्वरित कामांची माहिती देण्यासाठी माध्यम प्रतिनिधींचा दौरा आयोजित केला होता. यावेळी बोलताना दीक्षित यांनी फेब्रुवारी अखेपर्यंत हे काम पूर्ण होणारच, असे खात्रीपूर्वक सांगितले. संपूर्ण प्रकल्पाचे एकूण प्रकल्पाचे ७५ टक्के काम पूर्ण झाले आहेत. एअरपोर्ट ते सीताबर्डी या मार्गावरील काम पूर्णत्वाच्या (९५ टक्के)जवळ आहे. खापरी, न्यू एअरपोर्ट,  साऊथ एअरपोर्ट या स्थानकाची कामे  पूर्ण झाली असून एअरपोर्ट स्थानकाचे (एलिव्हेटेड) काम युद्धपातळीवर सुरू आहे. मेट्रोचे स्थानक आणि इतर कामे स्वतंत्रपणे केली जात आहेत आणि  सर्व कामे वेळापत्रकाप्रमाणे सुरू आहेत व ते निर्धारित वेळेत पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की रिच-१ मधील खापरी ते बर्डी या १९ किलोमीटरच्या अंतरावर एकूण पाच स्थानके असून त्यापैकी तीन स्थानकांची कामे पूर्ण झाली आहेत. रिच-३ मधील लोकमान्यनगर ते सुभाषनगर या १३ किलोमीटर दरम्यान ३ स्थानके आहेत. त्याचे कामही अंतिम टप्प्यात आहेत. ही कामे फेब्रुवारीअखेपर्यंत पूर्ण झाल्यावर या मार्गावरून  मेट्रो धावण्यासाठी सज्ज असेल. त्यासाठी करावी लागणारी सुरक्षा तपासणी आणि इतर कामेही वेळेतच पूर्ण केली जाईल. त्यानंतर टप्प्या टप्प्याने पुढील कामे केली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

उद्घाटनाचा निर्णय सरकारचा

मेट्रोच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार का, असा सवाल दीक्षित यांनी केला असता ते म्हणाले की, महामेट्रोमध्ये केंद्र आणि राज्य सरकारची भागीदारी आहे. महामेट्रोचे काम प्रकल्प पूर्ण करण्याचे आहे. उद्घाटनाबाबत सरकार निर्णय घेईल.

 

प्रवास भाडे

अंतर (कि.मी.)   दर (रु.)

०.२                     १५

२.४                     १९

४.६                      २३

६.९                      २८

९.१२                     ३०

१२.१५                   ३४

१५.१८                   ३६

१८.२१                  ३९

२१ पेक्षाअधिक     ४१

अ‍ॅपवर आधारित सायकल, ई-स्कूटर सेवा

प्रवाशांना मेट्रो स्थानकापासून घरापर्यंत किंवा कार्यालयापर्यंत किंवा अन्य ठिकाणी  जायचे असेल तर त्यासाठी महामेट्रोने ऑनलाईन टॅक्सीसेवेच्या धर्तीवर अ‍ॅपवर आधारित साधी सायकल आणि इलेक्ट्रिक स्कूटरची सेवा माफक दरात उपलब्ध करून दिली आहे. या सेवेचे उद्घाटन गुरुवारी डॉ. दीक्षित यांनी सायकल चालवून केले. ही अशाप्रकारची भारतातील पहिली सेवा असल्याचा दावा दीक्षित यांनी केला. सुरुवातीच्या काळात ही सायकल, स्कूटर सेवा शहरातील आठ स्थानकांवर व नंतर इतर सर्व स्थानकांवर सुरू केली जाईल. सध्या ३० साध्या सायकल आणि १० ई स्कूटर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अ‍ॅपवरील विशिष्ट कोड क्रमांक टाकल्यावरच सायकल किंवा स्कूटर सुरू होऊ शकेल. ज्या ठिकाणी जायचे आहे, त्या ठिकाणी हे वाहन सोडून प्रवाशी पुढे मेट्रोने प्रवास करू शकतो. त्याला चावीची गरज नाही. सायकलसाठी महिन्याला तीनशे रुपये तर ई-स्कूटरसाठी महिन्याला ६०० रुपये भाडे द्यावे लागेल. एक तासासाठी फक्त १ रुपया दहा पैसे शुल्क आकारण्यात येणार आहे.

महिला कोचला ‘नारीशक्ती’ नाव

मेट्रोच्या तीन कोचच्या गाडीमधील एक कोच हा महिलांसाठी राखीव असणार असून त्याला नारीशक्ती असे नाव देण्यात आले आहे. या कोचमध्ये फक्त महिलांनाच प्रवेश असेल. त्याचे बाह्य़स्वरुप अतिशय आकर्षक करण्यात आले असून महिलांना तो सहज ओळकता येईल. त्यात सुरक्षेसाठी सीसीटीव्हीची सोय करण्यात आली आहे.