नागपूर: जागतिक दर्जाची अशी बिरूद लावणारी, तांत्रिक क्षेत्रात अव्वल असल्याचा दावा करणाऱ्या महामेट्रोची गत एसटी महामंडळाच्या कधी आणि कुठेही बंद पडणाऱ्या बस सारखी झाली आहे. मंगळवारी रात्री वर्धा मार्गावर अचानक बंद पडली. अख्खी गाडी दुसऱ्या गाडीने ओढत नेली.

मेट्रो धावण्याची अधिकृतवेळ रात्री १० पर्यंत आहे. परंतु, मंगळवारी रात्री ११. १५ वाजता छत्रपती चौक मेट्रो स्टेशनच्या बाहेर काही अंतरावर एक मेट्रो तांत्रिक कारणामुळे रुळावरच अडकून बंद झाली. ती पुढेही सरकत नव्हती, मागेही जात नव्हती. जवळपास ५० मिनिटे ती छत्रपती मेट्रो स्टेशनच्या बाहेर उभी होती. अनेकदा हॉर्न वाजवून सूचना दिली जात होती. पुढे जाण्याचा प्रयत्नही करीत होती. परंतु, पुढे जाताच येत नसल्याने अखेर रात्री १२:१५ वाजता खापरीकडून दुसरी मेट्रो आली. या मेट्रोने बंद पडलेल्या मेट्रोला जोडल्यानंतर खापरीच्या दिशेने रवाना झाली.

हेही वाचा – अमरावती : महिमापूरची पायविहीर झळकली पोस्‍टकार्डवर! महाराष्‍ट्रातील आठ ऐतिहासिक विहिरींचा समावेश

हेही वाचा – वर्धा : विद्यार्थिनीवर बलात्कार, फरार आरोपींना पुण्यातून अटक

मेट्रोत तांत्रिक बिघाड झाल्याने १५-२० मिनिटे एकाच ठिकाणी उभी होती, असे मेट्रोने अधिकृतरित्या स्पष्ट केले. दरम्यान मेट्रो ट्रेनसोबतच छत्रपती चौक स्टेशनमध्येही सिग्नलमध्ये बिघाड झाला. त्याला दुरुस्त करता आले नाही. परिणामी, दीर्घकाळ मेट्रोला रुळावरच उभे राहावे लागले. त्यानंतर दुसऱ्या मेट्रोच्या मदतीने खापरीच्या दिशेने वाटचाल केली. वरील प्रकाराने मेट्रोचे तांत्रिक क्षमतेचे दावे फोल ठरले आहेत.