व्हर्टीकल गार्डन, मासिक पास दरात सवलतीची मागणी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनासाठी सज्ज असलेल्या नागपूर मेट्रोसाठी प्रवाशांची जुळवाजुळव महामेट्रोने सुरू केली आहे. मेट्रोच्या आकर्षणामुळे प्रवाशांच्या उडय़ा पडतील, असा अंदाज होता. मात्र प्रवाशीच मेट्रोत बसण्यासाठी अटी-शर्ती घालू लागले आहेत. त्यामुळे व्यवस्थापनापुढे नवीच समस्या उभी ठाकली आहे. मात्र याकडे सकारात्मक नजरेतून बघण्याचे धोरण  व्यवस्थापनाने स्वीकारले आहे.

खापरी ते बर्डी या टप्प्यातील मेट्रो रेल्वेचे काम जवळजवळ पूर्ण झाले असून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी या मार्गावर मेट्रो रेल्वे सुरू करण्याचे महामेट्रोचे प्रयत्न आहेत. हा मार्ग मिहानमधील विविध कंपन्यांसाठी सोयीचा आहे. तेथील कर्मचाऱ्यांनी मेट्रोचा वापर करावा, असे महामेट्रोचे प्रयत्न आहेत. त्या अनुषंगाने त्यांनी ‘ मेट्रो संवाद’च्या माध्यमातून मिहानमध्ये कार्यक्रम घेऊन तेथील कर्मचाऱ्यांना मेट्रोतून प्रवास करण्याचे आवाहन केले. मात्र, कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमात मेट्रोकडेच अनेक मागण्या केल्या. कंपन्यांच्या प्रवेशद्वारापर्यंत फिडर बससेवा सुरू करणे ही त्यातली प्रमुख मागणी होती. हिंगणा एमआयडीसीमध्ये अशाच प्रकारचा कार्यक्रम झाला. तेथील एका कंपनीने तर त्यांच्या प्रवेशद्वारापुढे व्हर्टीकल गार्डन (झाडे लावलेला मेट्रोचा सिमेंट पिल्लर) उभारण्याची मागणी केली, एका कंपनीतील कर्मचाऱ्यांनी सवलतीच्या दरात मासिक पास मेट्रोने द्यावी, अशी मागणी केली. वास्तविक प्रकल्पाचे काम सुरू होण्याच्या पहिल्या दिवसापासून मेट्रो रेल्वेबाबत नागपूरकरांना कमालीचे आकर्षण आहे. मेट्रोचे भव्य काम, आकर्षक स्थानक, रेल्वेत असणाऱ्या सोयीसुविधा, तिची गती आणि इतरही बाबी यासाठी कारणीभूत ठरल्या आहेत. दुसरीकडे मोडकळीस आलेल्या महापालिकेच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेलाही जनता कंटाळली आहे. त्यामुळे मेट्रो सुरू झाल्यावर त्यातून प्रवास करण्यासाठी प्रवाशांच्या उडय़ा पडतील, असा अंदाज होता. प्रत्यक्षात महामेट्रो प्रशासनाला आलेला अनुभव या विपरीत ठरला.

वेळेची बचत, वाहतूक कोंडीतून सुटका आणि सुरक्षित प्रवास ही मेट्रोची वैशिष्ट आहेत. हे पटवून देतानाच अधिकाऱ्यांना प्रवाशांच्या वाढत्या मागण्यांचाही पुढच्या काळात विचार करावा लागणार हे वरील बाबींवरून दिसून येत आहे.

यासंदर्भात महामेट्रोचे जनसंपर्क अधिकारी अखिलेश हळवे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी व्यवस्थापनाने ही बाब सकारात्मकदृष्टीने घेतल्याचे सांगितले.  नुसता मेट्रोचा मार्ग तयार केल्याने मेट्रो चालणार नाही तर, मेट्रोच्या स्थानकापासून तर वेगवेगळ्या कार्यालयांपर्यंत किंवा औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांपर्यंत कर्मचाऱ्यांना सहजपणे जाता यावे

यासाठी फिडर सेवा सुरू करणे हा सुद्धा प्रकल्पाचाच एक भाग आहे, त्यामुळे या सेवा प्रवाशांना देण्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत. काही कंपन्यांनी व्हर्टीकल गार्डनची मागणी केली आहे. संपूर्ण शहरात २०० पिल्लरवर हे गार्डन तयार केले जाणार आहे. मेट्रोकडे विविध मागण्या करणे हा प्रवाशांचा मेट्रोप्रती असणारा उत्साह दर्शवणारा असल्याचे ते म्हणाले.

चार स्थानकावर भाडेपट्टीने जागा

मेट्रोच्या खापरी, एअरपोर्ट साऊ थ, न्यू-एअरपोर्ट आणि जयप्रकाश नगर या चार स्थानकावर व्यवसायिकांसाठी भाडेपट्टीवर जागा देण्यात येणार आहे. जागेचे शुल्क निर्धारित करण्यात आले असून त्याची माहिती महामेट्रोच्या वेबसाईटवर उपल्बध आहे.सीताबर्डी मेट्रो जंक्शन ते खापरीपर्यंत आणि हिंगणा मार्गावर सुभाष नगर व लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन नागरिकांसाठी सुरु होणार आहे.