यवतमाळ : येथील वीर वामनराव चौक परिसरात विजेच्या रोहित्रावर अडकलेल्या दोन माकडांना वाचवण्यासाठी ‘एमएच २९ हेल्पिंग हॅन्ड’ वन्यजीव संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जीव धोक्यात घालून बचावकार्य केले. त्यातील एका माकडीणीची प्रकृती गंभीर असल्याने तिला तातडीच्या वैद्यकीय उपचारांची आवश्यकता होती. मात्र, वनविभागाच्या निष्काळजीपणामुळे वेळेत मदत न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला.
या प्रकरणी हलगर्जीपणा करणारे वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन एमएच २९ हेल्पिंग हँड वन्यजीव संघटनेने वनमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठवले. शहरातील वीर वामनराव चौकातील राजलक्ष्मी मल्टीस्टेट बँक परिसरात बुधवारी सकाळी दोन माकडे वीज रोहित्रावर अडकून होती. या घटनेची माहिती बँकेचे कर्मचारी पवन आंबटकर यांनी एमएच २९ हेल्पिंग हॅन्ड वन्यजीव संघटनेचे शुभम तेलगोटे यांना दिली. माहिती मिळताच त्यांनी महेश शेळके, रवी वाईकर, बॉबी बगमारे, प्रा. पंढरी पाठे यांच्या सहकार्याने घटनास्थळी धाव घेतली.
दोन्ही माकडांना विजेचा जबर झटका बसला होता. एक माकडीण गर्भवती होती, तर दुसरे माकड लहान होते आणि तेही गंभीररित्या भाजले होते. हेल्पिंग हॅन्ड टीमच्या सदस्यांनी धोकादायक विद्युत प्रवाह सुरू असतानाही प्रसंगावधान दाखवत दोन्ही माकडांचे यशस्वी रेस्क्यू केले. त्यानंतर तातडीने पशुवैद्यकीय रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले.
डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले, परंतु माकडीण अत्यवस्थ असल्याने पुढील उपचारांसाठी तिला वर्धा येथे हलविण्याचा सल्ला दिला. मात्र, यवतमाळमध्ये वन्यजीव उपचार केंद्र नसल्यामुळे वनविभागाची परवानगी आणि वाहनाची आवश्यकता होती. प्रा. पंढरी पाठे,बॉबी बगमारे आणि जुनेद मलनस यांनी तत्काळ रेंज ऑफिस गाठून मदतीची विनंती केली.
रेंज ऑफिसमधील कर्मचाऱ्यांनी प्रोटोकॉलनुसार प्रक्रिया होईल, पण त्याला दुपारपर्यंत वेळ लागेल,असे सांगितले. ऑफिसमधील कर्मचाऱ्यांनी गाडीसाठी डिझेल नाही. साहेबांची परवानगी लागेलमेल करावा लागेल, अशी टाळाटाळ केल्याचा आरोप प्रा. पंढरी पाढे यांनी केला आहे. एमएच२९ हेल्पिंग हॅन्ड टीमने वेळीच माकडांचा रेस्क्यू केला होता.
पण वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे एका माकडीण आणि तिच्या गर्भातील पिल्लाचा मृत्यू झाला. वेळेत उपचार मिळाले असते, तर ते वाचू शकले असते. यासाठी पूर्णपणे वनविभाग जबाबदार असल्याचा आरोप वन्यजीव कार्यकर्त्यांनी केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ एमएच २९ हेल्पिंग हॅन्ड वन्यजीव संघटनेचे अध्यक्ष निलेश मेश्राम, उपाध्यक्ष प्रज्वल तुरकाने, सचिन मनवर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज शुकव्रारी जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या मार्फत वनमंत्री यांना निवेदन दिले.
या निवेदनात जबाबदार वन अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे युवा प्रमुख शुभम तेलगोटे, जीवन तडसे, जुबेर मलनस, गट्टू भगत, बॉबी बगमारे, महेश शेळके, आदित्य गणवीर, अभिजीत वाघमारे, रवी वाईकर, चिन्मय आडे, सनी मुरारी आदी उपस्थित होते.