विदर्भासाठी औद्योगिक प्रगतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ‘पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स’ आणि ‘फेरोअलॉय क्लस्टर’ बाबत सर्वेक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याची जबाबदारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे देण्यात आली आहे.
हेही वाचा- आर्थिक सल्लागार परिषदेवर विदर्भाला प्रतिनिधित्व द्या, डॉ. नितीन राऊत यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
‘एमआयडीसी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन शर्मा यांच्याकडे या दोन्ही प्रकल्पांचे सर्वेक्षण अहवाल तयार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. यासाठी ‘एमआयडीसी’चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उपेंद्र तामोरे नागपुरात असतील. बुटीबोरी औद्योगिक वसाहत भाग-२ मध्ये पुरेशी जागा उपलब्ध आहे. त्या ठिकाणी ‘पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स’ होऊ शकेल काय याबाबत अभ्यास करण्यात येणार आहे. तर रामटेक तालुक्यात ‘फेरोअलॉय क्लस्टर’ उभारण्याबाबत अभ्यास करण्यात येणार आहे. पुढील दोन महिन्यात अहवाल तयार करण्यात येईल.
हेही वाचा- नागपूर : संक्रांतीनिमित्त विष्णू मनोहर यांनी केली दोन हजार किलोंची खिचडी
‘पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स’मध्ये ६० पेक्षा जास्त उत्पादने तयार होतात. जे वेगवेगळ्या उद्योगात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे वापरले जातात. त्यामुळे विदर्भ इकॉनामिक डेव्हमेंट कौन्सिलने (वेद) नागपूरजवळ ‘पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स’ उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे. या मध्यवर्ती स्थानाच्या कारणांमुळे व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य ठरेल असा त्यांचा दावा आहे. ‘फेरोअलॉय क्लस्टर’ विकसित करण्याचे प्रस्तावित आहे. यामुळे स्थानिक संसाधनांचा प्रभावी आणि कार्यक्षम वापर होईल. सुमारे ४० वर्षांपूर्वी नागपूर आणि विदर्भाच्या आसपासच्या भागात सर्वात मोठे ‘फेरोअलॉय’ उत्पादन केंद्र होते. अवाजवी उच्च वीज दरामुळे हे नागपूरजवळील ‘फेरोअलॉय युनिट्स’ मुख्यत: बंद पडली.
हेही वाचा- चंद्रपुरात भूकंपाचे धक्के
वेद कौन्सिलचे सादरीकरण
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान वेदच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांची विदर्भाच्या विकासात्मक मुद्यांवर चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत भेट घेतली. यावेळी वेद कौन्सिलने सादरीकरण केले होते. यामध्ये विदर्भातील ‘पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स’ आणि ‘फेरोअलॉय क्लस्टर’ हे दोन मुद्दे होते, अशी माहिती वेदचे अध्यक्ष देवेंद्र पारेख यांनी दिली.