नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अधिसभा, विद्वत परिषद व अभ्यास मंडळाच्या मतमोजणीला मंगळवारी सकाळी दहा वाजतापासून सुरुवात झाली. यात प्राचार्य आणि व्यवस्थापन गटात विद्यापीठ शिक्षण मंचाला दणदणीत यश मिळाले. त्यामुळे प्रतिस्पर्धी महाआघाडीला धक्का बसला. या दरम्यान रात्री १ वाजताच्या सुमारास मतमोजणी स्थळी शिक्षक प्रवर्गातील मतमोजणी सुरू असताना प्राचार्य डॉ. माथनकर यांनी माजी प्राचार्य व जेष्ठ सदस्य डॉ. बबनराव तायवाडे यांना निवडणुकीवरून डिवचल्याची माहिती आहे. यामुळे संतप्त डॉ. तायवाडे यांनी मतमोजणी केंद्रातच गोंधळ घातला.
हेही वाचा: येथे गर्भातच होतो बाळांचा सौदा…!; अनेक निपुत्रिक दाम्पत्यांची नागपूरकडे धाव
उपस्थितांनी समजूत काढत तायवाडे यांना केंद्राच्या बाहेर आणले. मात्र माथनकर यांची टीका जिव्हारी लागल्याने तायवाडे व समर्थकांनी केंद्राबाहेर गोंधळ घातला. शेवटी विद्यापीठातील काही अधिकारी व प्राध्यापकांनी मध्यस्थी करत प्रकरण मिटवले. परंतु या प्रकारामुळे विद्वतजणांच्या निवडणुकीत गावगुंडाप्रमाणे भांडण्याचा प्रकार दिसून आल्याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात रंगली.