नागपूर : पळस फुलताच “रोझी स्टार्लिंग” म्हणजेच पळस मैना पूर्व युरोप आणि पश्चिम व मध्य आशियातून महाराष्ट्रात स्थलांतर करत येतात. यंदाही त्या आल्या असून आता परतीच्या वाटेवर आहेत. उपराजधानीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा परिसर म्हणजे त्यांचा हक्काचा अधिवास. यंदाही त्या मोठ्या संख्येने मुक्कामी होत्या आणि आता त्या परत जात आहेत. हलकी गुलाबी झाक असलेल्या आणि काळा अंगरखा घातल्यासारख्या दिसणाऱ्या सडपातळ बांध्याच्या परदेशी पळस मैना आपल्या परीसरात पळस फुलल्याबरोबर दिसू लागल्या आहेत. पळसाशी त्यांचे प्राचीन नाते सांगत पूर्व युरोप, पश्चिम, मध्य आशियातून या मैना महाराष्ट्रात येतात. कडक थंडीपासून बचाव करण्यासाठी पळस मैना पूर्व युरोप आणि पश्चिम व मध्य आशियातून हिवाळ्यात स्थलांतर करून भारतात येतात.
हेही वाचा : ‘रेमंड’मधील अधिकाऱ्याच्या बंगल्यातून चक्क ३० लाखांचे दागीने लंपास; सुरक्षा भेदून चोरी
‘भोरडी’ या नावानेही ओळखल्या जाणाऱ्या या पक्षाला इंग्रजीत ‘रोझी स्टार्लिंग’ असे नाव आहे. भारतातील वातावरण या पक्ष्यांसाठी पोषक असते. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यापर्यंत हे पक्षी भारतात राहतात. शेताचे मोकळे रान, तलावांजवळ तसेच निमवाळवंटी प्रदेश हे त्याच्या वास्तव्याचे आवडीचे ठिकाण आहे. शेतातील टोळ, नाकतोडे, अळ्या असे शेतीस हानिकारक कीटक त्यांचे आवडीचे अन्न असल्याने हा पक्षी शेतकऱ्यांचा मित्रच समजला जातो. हा पक्षी आपल्या भागात साधारणत: पळसाला फुले आल्यानंतर दिसतो त्यामुळे त्याला पळस मैना म्हटले जाते. पण, पळसातील फुलांचा मधुरस पिण्यासोबत विविध प्रकारचे कीटक, वड-पिंपळ, अशा वृक्षांच्या बिया, सावरीच्या फुलांतला मधही आवडीने या मैना आवडीने प्राशन करतात. आपल्या विष्ठेतून बीजप्रसार करून दूरदूरपर्यंत वृक्षारोपणासही त्या मदत करतात. हे पक्षी हजारोंच्या संख्येने प्रवास करत असल्याने त्यांचे प्रचंड मोठे थवे दिसतात.
हेही वाचा : दुर्दैवी! मुदत संपण्यापूर्वीच सेंट्रिंग काढल्याने स्लॅब कोसळले, दोन मजूर मृत्यूमुखी
कधी कधी त्यांच्या विशिष्ट लयीतील उड्डाणे, कसरती यामुळे एखादा छोटा ढग आकाशातून जातोय, असाही भास होतो. अनेक पक्षी स्थलांतर करतात, पण या पक्षाच्या स्थलांतराचे कोडे वैज्ञानिकांना अजूनही पूर्ण सुटलेले नाही. हा पक्षीसुद्धा नेमका पळस फुलण्याच्या काळातच कसा हजर होतो, हेही एक कोडेच आहे. या पळस मैना अनेकदा सामान्य मैना, कवडी मैना, ब्राह्मणी मैना या स्थानिक मैनांसोबतही मैत्री करत त्यांच्यासोबत बसलेल्या किंवा खाद्यंती करताना दिसून येतात. पण, मोठ्या संख्येने असल्याने कधी कधी दादागिरीही करतात. पळस, सावरीच्या फुलांवर हक्क सांगत इतर पक्ष्यांशी भांडून त्यांना तिथून घालवून देतानाही दिसतात. यांना पळस मैना, गुलाबी मैना, भोरडी आणि मधुसारिका अशी नावे आहेत.