गोंदिया : गोंदिया जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात मोठे ९, तर मध्यम १८ आणि लघु ४२ सिंचन प्रकल्प आहेत. यापैकी जिल्ह्यातील काही जलाशय आणि तलाव परिसरात दरवर्षी हिवाळ्याला सुरुवात होताच विदेशी पक्ष्यांच्या आगमनाला सुरुवात होते.
विशेषतः युरोपीयन देश तसेच मंगोलिया, सायबेरिया परिसरातून विदेशी पक्षी मोठ्या प्रमाणात नोव्हेंबर महिन्यात दाखल होतात. जिल्ह्यातील तलाव व पक्ष्यांचे आवडते खाद्य येथे उपलब्ध असल्याने मोठ्या संख्येने विदेशी पक्ष्यांचे आगमन होते. सध्या नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून गोंदिया जिल्ह्यातील विविध जलाशयांवर विदेशी पाहुण्यांचे आगमन होण्यास सुरुवात झाली आहे.
हेही वाचा…आजी आजोबांसोबत शिक्षण: युवा शिक्षकाचा अफलातून प्रयोग
जिल्ह्यातील जलाशयांवर विदेशी पक्ष्यांचा क्रम मागील १५ ते वीस वर्षांपासून कायम आहेत. यात कसलाही बदल अथवा खंड पडलेला नाही. दरवर्षी या पक्ष्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचे पक्षी निरीक्षकांनी सांगितले.
हजारो कि.मी.चा प्रवास करुन होतात हे पक्षी दाखल
युरोपीयन देशात वाढत्या थंडीमुळे येथे स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन सुरू झाले आहे. अनुकूल वातावरण आणि हवे असलेल्या अन्नाची उपलब्धता लक्षात घेऊन हे पक्षी प्रवास करीत असतात. स्थलांतरित पक्षी हजारो किलोमीटर अंतर कापून नोव्हेंबर पासून तर डिसेंबर आणि फेब्रुवारी महिन्यापर्यंत या पक्ष्यांचा मुक्काम असतो. तर वसंत पंचमीपासून या परदेशी पाहुण्यांच्या परतीचा प्रवास सुरू होतो.
या पक्ष्यांचे होते आगमन
येथे येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांमध्ये पिटलेस, कॉमन पोचाई, व्हाइट आय पोचाई, युरेशियन विजन, मलाई गार्गणी, कॉब डक, ग्रेलॉक गुरज, रेड क्रेस्टेड पोचाई, मलाई, गर्गनी, आक्टिंक टर्न, सायबेरियन स्टॉर्क, ब्लॅक टेलेड गॉडविट, कॉमन डिल, सायबेरियन क्रेन, नॉर्दर्न पिनटेल, ओपन बिल स्टॉर्क ब्लॅक हेड, ब्लॅक हेड एम्बिस, पांढरा स्तन, पट्टे स्टार्क, कार्पोरेट, पॅरामपल मोहॅन, मार्स हेरियर, युरशियन कलू, लिटिल स्टिंट, वॉटरहेन, राखाडी बगळा, कमी पंख असलेला गरुड यांचा समावेश असतो,
हेही वाचा…निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाचा १४ वर्षीय मुलीवर बलात्कार
या देशातून येतात हे पक्षी
जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यापासून विदेशी पक्ष्यांच्या आगमनास सुरुवात होते. यानंतर फेब्रुवारी महिन्यापर्यंत या पक्ष्यांचा जिल्ह्यात मुक्काम असतो. हे पक्षी युरोपीयन देश तसेच मंगोलिया, सायबेरिया आणि हिमालयाच्या दिशेकडून दाखल होतात. जवळपास चार महिने या पक्ष्यांचा मुक्काम जिल्ह्यात असतो.
या पाणवठ्यांवर असतो मुक्काम
गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध, नागझिरा, सिरेगावबांध, भुरशीटोला, चूलबंद प्रकल्प, पुजारीटोला, बाजारटोला, परसवाडा, झिलमिली, आमगाव तालुक्यातील नवतलाव, महादेव टेकडी परिसर, झालिया तलाव आणि अंजोरा तलाव परिसरात परदेशी पक्ष्यांचा मुक्काम असतो.
“विदेशी पक्ष्यांसाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यापर्यंतचा कालावधी अनुकूल असतो. युरोपीयन देश तसेच मंगोलिया, सायबेरिया या देशात या कालावधीत थंडी अधिक असते, तर त्या तुलनेत या आपल्या भागात थंडी कमी असते. शिवाय जलाशयांमध्ये पक्ष्यांचे आवडते खाद्य मिळत असल्याने या परिसरात विदेशी पक्ष्यांचे मोठ्या प्रमाणात आगमन होते. सध्या विदेशी पक्ष्यांच्या आगमनाला सुरुवात आली आहे.” प्रा. शरद मेश्राम, पक्षी निरीक्षक तथा अभ्यासक, नवेगाव बांध.