भारत सरकार आणि अमेरिकन कंपनी बोईंग यांच्यातील करारानुसार नागपुरातील मिहानमध्ये आंतराष्ट्रीय सोयीसुविधायुक्त ‘मेन्टनन्स, रिपेअर, ऑपरेशन’ (एमआरओ) केंद्र उभारण्यात आले मात्र, ते सुरू करून चालू करण्याची जबाबदारी ज्या कंपनीवर येऊन पडली, त्या एअर इंडिया कंपनीची पत आणि अपुरे मनुष्यबळ यामुळे ते चालविण्यासाठी खासगी कंपनीचा सहभाग घेण्यासाठी हालचाली सुरू आहेत.
‘मल्टी मॉडेल कार्गो हब अॅट नागपूर’ (मिहान)मध्ये ‘मेन्टनन्स, रिपेअर, ऑपरेशन’ (एमआरओ) हे सुसज्ज केंद्र गेल्या दोन महिन्यांपासून तयार आहे. एअर इंडियाची बोईंग-७७७ ही विमाने येथे दोनदा देखभाल दुरुस्तीसाठी आणण्यात आली. त्यासाठी ‘एमआरओ’चे औपचारिक उद्घाटन झाले नसले तरी ही बोईंग ७७७ विमाने देखाभाल-दुरुस्तीसाठी सुसज्ज आहे. पण सर्वप्रकारच्या विमानांची मात्र येथे देखभाल-दुरुस्ती सध्यातरी येथे होऊ शकत नाही. अपुरे मनुष्यबळ आणि साधनसामुग्रीची अनुपलब्धता असल्याचे एअर इंडियाचे अधिकारी सांगतात.
एअर इंडियाकडे प्रशिक्षित मनुष्यबळाची अनुपलब्धता आणि त्या कंपनीची आंतरराष्ट्रीय पातळीवरील पत या दोन प्रमुख बाबी लक्षात घेऊन आता हे ‘एमआरओ’ चालविण्यासाठी भागीदार शोधण्याचे काम सुरू आहे. एअर इंडियाने बोईंगकडून ११३ विमाने खरेदी केली. त्यावेळी भारत सरकार आणि बोईंगमध्ये झालेल्या करारानुसार बोईंगने भारतात ‘एमआरओ’ची उभारणी केली आणि हे केंद्र एअर इंडियाकडे हस्तांतरित केले. यामध्ये १०० बाय १०० मीटरचे दोन हँगर आहेत. प्रत्येकी एका हँगरमध्ये एकाचवेळी दोन मोठी विमाने किंवा सहा छोटी विमाने उभे करण्याची क्षमता आहे. बोईंगचा अमेरिके बाहेरील हा दुसरा ‘एमआरओ’ आहे. यात सौरऊर्जा सुविधा, नैसर्गिक प्रकाश योजना आणि रेन वॉटर हार्वेस्टींगची सुविधा आहे. तो सुमारे ५० एकर जागेत आहे. नागपुरातील या ‘एमआरओ’मध्ये मोठय़ा देशी आणि विदेशी विमानांची देखभाल-दुरुस्ती होणे अपेक्षित आहे. एअर इंडियाने विमान खरेदीचा २००५ मध्ये करार केला. या मूळ करारानुसार बोईंगने एअर इंडियासाठी ‘एमआरओ’ची उभारणी करून चालू करणे अपेक्षित होते. पण एअर इंडियाने ‘एमआरओ’ चालवण्यास पसंती दिली. बोईंगने तो प्रस्ताव स्वीकारला आणि एमआरओ हस्तांतरित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय विमान वाहतूक मंत्र्यांशी चर्चा करून एमआरओत खासगी कंपनीच्या सहभागातील अडथळा दूर करण्यात येईल, असे सांगितले.‘एमआरओ’ची केवळ ६० ते ७० टक्के कामे झाली आहेत. यामुळे येथे केवळ बोईंग ७७७ या जातीच्या विमानांची देखभाल दुरुस्ती करता येईल. पण इतर विमाने येथे दुरुस्त केली जाऊ शकत नाही. या ‘एमआरओ’ची चाचणीही झाली नसून ते अद्याप पूर्णपणे सज्ज नाही.
– सुनील अरोरा, उपमहाव्यवस्थापक, एअर इंडिया
मिहानमधील ‘एमआरओ’ चालविण्यासाठी बहुराष्ट्रीय कंपनीची मदत घेण्याच्या हालचाली
भारत सरकार आणि अमेरिकन कंपनी बोईंग यांच्यातील करारानुसार नागपुरातील मिहानमध्ये आंतराष्ट्रीय सोयीसुविधायुक्त ‘मेन्टनन्स, रिपेअर, ऑपरेशन’ (एमआरओ) केंद्र
Written by चैताली गुरवguravchaitali
First published on: 08-09-2015 at 08:17 IST
TOPICSमिहान
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mihan mro