टाटा उद्योग समूहाच्या विस्तारासाठी मिहान योग्य ठिकाण आहे, त्यामुळे टाटा समूहाने त्यांच्या इतर प्रकल्पासाठी मिहानचा विचार करावा, अशी विनंती करणारे पत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलचे (वेद) उपाध्यक्ष प्रदीप माहेश्वरी यांनी टाटा सन्सचे प्रमुख नटराजन चंद्रशेखरन यांना पाठवले आहे. राज्याचे उद्योग मंत्री उदय सावंत यांनी टाटाचा एअरबसचा प्रकल्प नागपूरला येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे पुढच्या काळात मिहानला सुगीचे दिवस येण्याची शक्यता आहे.
गडकरी यांनी चंद्रशेखरन यांना पाठवलेल्या पत्रात सध्या मिहानमध्ये सुरू असलेल्या दोन प्रकल्पांचा उल्लेख केला. ‘टाल’ आणि ‘ टीसीएस’ हे दोन प्रकल्प सुरू आहेत. पुढच्या काळात उद्याग विस्तारासाठी टाटा समूहाला मिहानमध्ये अनुकूल वातावरण आहे, त्यासाठी या जागेचा विचार केला जाऊ शकतो, याच अनुषंगाने विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलचे (वेद) शिष्टमंडळ आपल्याला भेटू इच्छिते, असेही गडकरी यांनी पत्रात नमूद केले आहे. त्याचप्रमाणे वेदचे उपाध्यक्ष प्रदीप माहेश्वरी यांनीही नटराजन चंद्रशेखरन यांना पत्र पाठवून मिहानमध्ये गुंतवणूक करणे किती फायद्याचे आहे, याकडे लक्ष वेधले.
हेही वाचा : सर्वधर्मसमभाव ही हिंदुत्वाची आधारशिला ; नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
माहेश्वरी म्हणतात, नागपुरात, शासनाने मिहान (मल्टी-मॉडल हब विमानतळ) येथे विशेष आर्थिक क्षेत्र ( सेझ) विकसित केले. येथे टाटा समूहातील अनेक कंपन्यांना व्यवसाय वाढीसाठी उपयुक्त अशी भरपूर जमीन आहे. येथे अनेक ऑनलाईन मार्केटिंग कंपन्यांचे गोदाम आहेत. याचा टाटा समूहाच्या विविध कंपन्यांसाठी (टाटा मोटर्स, ग्राहकोपयोगी वस्तू, टाटा स्कूल) यांच्यासाठी अनुकूल स्थिती आहे. सहा राज्याील ३५० जिल्ह्यांशी संपर्क, जमिनीचे कमी दर, मनुष्यबळ आणि गोदाम तसेच रस्ते, रेल्वे आणि हवाई मार्गाची कनेक्टिव्हिटी याचाही फायदा होऊ शकतो.
हेही वाचा : नागपूर : भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार दत्ता मेघे यांना स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार
मिहान येथे एअर इंडियाचे एमआरओ आधीपासूनच कार्यरत आहे, टाटा समूहाची मोहीम आणि दूरदृष्टी लक्षात घेता, मिहान येथे अधिक एमआरओएसची योजना केली जाऊ शकते. कारण येथे एमआरओसाठी धावपट्टी कनेक्टिव्हिटी आधीच अस्तित्वात आहे. टाटा समूह विमान वाहतुकीसाठी मोठ्या गोदामांची योजना करू शकतो. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूरचे असून त्यांचा नेहमीच या क्षेत्रात गुंतवणूक वाढीसाठी प्रयत्न असतो. या संदर्भात, वेदचे शिष्टमंडळ आपणास भेटण्यास इच्छुक आहे. विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिल ही नागपुरातील २७ वर्षे जुनी स्वयंसेवी संस्था असून विदर्भाच्या आर्थिक विकासासाठी काम करते हे येथे उल्लेखनीय आहे.