अकोला : शहरामध्ये भूकंपाचा सौम्य धक्का बुधवारी सकाळी बसला आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात असला तरी शहरात अनेकांना हादरे जाणवले. त्यामुळे सकाळपासून नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. भूकंपाचे धक्के बसताच अनेक नागरिक घराबाहेर पडले. भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांसह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये बुधवारी भूकंपाचे धक्के बसले. सकाळी ७.१४ वाजता अकोल्यासह नांदेड, परभणी, हिंगोली, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यात भूकंपाचे धक्के बसले. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावात आहे. त्याठिकाणी भूकंपाची तीव्रता रिष्टर स्केल वर ४.५ नोंदविण्यात आलेली आहे.

हेही वाचा >>>‘जेईई’,‘नीट’चा अनुभव नसणाऱ्या संस्थांना विनानिविदा कंत्राट; ‘बार्टी’च्या संस्था निवडीच्या…

दरम्यान, अकोल्यातील जुने शहर भागात सौम्य धक्का जाणवला. रामदासपेठ, जठारपेठ, गोरक्षण रोड आदी भागांमध्ये देखील भूकंपाचा धक्का जाणवल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. या भूकंपाच्या धक्क्यामध्ये जिल्ह्यात कोणतेही नुकसान झाले नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. अकोला शहरात अचानक भूकंपाचे हादरे जाणवल्याने नागरिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक जण समाज माध्यमांवर व्यक्त झाले. त्यांनी भूकंपाचे धक्का बसल्याचे म्हटले आहे.

या भूकंपाचा केंद्रबिंदू अकोला जिल्ह्यात नाही. हिंगोली जिल्ह्यात केंद्रबिंदू नोंदवल्या गेला. शहरात कुणा-कुणाला भूकंपाचे धक्के जाणवले याची एकमेकांकडे विचारणा केली जात आहे. शहराच्या विविध भागात भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांनी सकाळीच घराबाहेर धाव घेतली होती. भूकंपाचे सौम्य धक्के असून त्याचा केंद्रबिंदू देखील हिंगोली जिल्ह्यात असल्याचे कळल्यावर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. भूकंपाच्या धक्क्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.

हेही वाचा >>>खुशखबर… ‘बामणी प्रोटीन्स’ कंपनी लवकरच सुरू होणार;  शेकडो कामगारांना दिलासा

अकोला जिल्ह्यात यापूर्वी मार्चमध्ये झाला होता भूकंप

अकोला जिल्ह्यात यापूर्वी मार्च महिन्यात देखील भूकंपाचे धक्के बसले होते. त्यावेळी केंद्रबिंदू देखील जिल्ह्यातच नोंदवल्या गेला होता. जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात अंत्री भागात २६ मार्च रोजी सायंकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. त्याचवेळी मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली आदी जिल्ह्यांमध्ये भूकंप झाला होता. त्यामुळे अकोला जिल्ह्यात देखील भूकंप जाणवल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती. मात्र, त्याची कुठलीही नोंद झाली नव्हती. दरम्यान, २६ मार्चला सायंकाळी ६.२७ वाजता जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील अंत्री मलकापूर परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता २.९ रिश्‍टर स्केल नोंदवली गेली होती. या घटनेमुळे गावकरी चांगलेच हादरून गेले होते. त्यानंतर आता चार महिन्यांनी अकोला शहराला भूकंपाने हादरा दिला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mild earthquake jolts akola city ppd 88 amy