अकोला : जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात अंत्री भागात मंगळवारी सायंकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. गेल्या आठवड्यात मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये भूकंप झाला होता. त्यानंतर आज अकोला जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य हादरे बसले आहेत.
लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना जिल्ह्यात आज भूकंपाची घटना समोर आली. गेल्या आठवड्यात मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली आदी जिल्ह्यांमध्ये भूकंप झाला होता. त्याच दिवशी अकोला जिल्ह्यात देखील भूकंप जाणवल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती. मात्र, त्याची कुठलीही नोंद झाली नव्हती. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी ६.२७ वाजता जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील अंत्री मलकापूर परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता २.९ रिश्टर स्केल नोंदवली गेली, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. या घटनेमुळे गावकरी चांगलेच हादरून गेले आहेत.