यवतमाळ: जिल्ह्यातील उमरखेड , पुसद भागात आज बुधवारी भूकंपांचे सौम्य धक्के जाणवले. सकाळी ७.१५ वाजता गडगड आवाज करत जमीन हादरली. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.प्राथमिक माहितीनुसार, या भूकंपची तीव्रता रिष्टर स्केल वर ४.५ नोंदविण्यात आलेली आहे.भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावात असल्याचे सांगण्यात आले. उमरखेड , पुसद शहरांसह नांदेड व परभणी जिल्ह्यातही या भूकंपाचे धक्के जाणवले. उमरखेडमध्ये भूकंपाचे धक्के जाणवताच अनेक भागातील नागरिकांनी घाबरून घरातून बाहेर रस्त्यावर येत धावपळ केली. या धक्क्याने कोणतीही जीवित व वित्तहानी झाली नाही. भूकंपाच्या या सौम्य धक्क्याची माहिती समाज माध्यमांतून पसरली. त्यामुळे सर्वत्र भूकंपाची चर्चा सुरू आहे. जिल्ह्यातील उमरखेड , पुसद हा भाग मराठवाड्या सीमेलगतच्या भाग आहे.
मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना भूकंपाचे हादरे बसले आहेत. हिंगोलीतील रामेश्वर तांडा हे भूकंपाचे केंद्र आहे. या भूकंपानंतर यवतमाळ प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. अद्याप प्रशासनने कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. पण यवतमाळ जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी सविस्तर माहिती घेत असल्याचे सांगण्यात आले. उमरखेड येथील उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांच्याशी संपर्क साधला असता झाला नाही. तलाठ्यांकडून माहिती घेतली असता उमरखेड तालुक्यात कोणत्याही प्रकारची मालमत्तेची अथवा जीवितहानी नसल्याचे सांगितले. उमरखेडमध्ये जाणवलेले धक्के सौम्य स्वरूपाचे असून कुठेही नुकसान झालेले नाही. तरी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
हेही वाचा >>>अकोल्यातही भूकंपाचा धक्का; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…
यापूर्वीही मार्च महिन्यात मराठवाड्यातील हिंगोली, नांदेडसह पुसद, उमरखेड तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. तेव्हाही भूकंपाचे केंद्र रामेश्वर तांडा हेच होते. त्यावेळे पेक्षा आजचा धक्का सौम्य होता. आज सकाळी केवळ १५ ते २० सेकंद पर्यंत हे धक्के जाणवल्याचे नागरिकांनी सांगितले. या भागात वारंवार भूकंपाचे धक्के बसत असल्याने या भागातील भौगोलिक परिस्थिती तर बदलली नाही ना, अशी शंका या परिसरातील जनतेने उपस्थित केली आहे. विदर्भ, मराठवाडा सीमेवर इसापूर, पुस प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे तर येथील भूगर्भ रचनेत हालचाली सुरू नसेल ना, अशीही भीती उपस्थित होत आहे. हिंगोली जिल्ह्यातील रामेश्वर तांडा या परिसरात भूकंपाचे केंद्र आढळल्याने या परिसरात भू वैज्ञानिकांनी अभ्यास करण्याची मागणी पुढे आली आहे. यवतमाळ हा उंच व पठारी जिल्हा असल्याने या भागात भूकंपाचा धोका नाही, असे सांगितले जात होते. मात्र अलीकडे उमरखेड, पुसद या तालुक्यात वारंवार भूकंपाचे धक्के बसत असल्याने नागरिक भयभीत आहे.