देवेश गोंडाणे

नागपूर : आरोग्य विभाग ‘गट क’ पेपर फुटीचा मास्टरमाइंड असलेल्या निशिद गायकवाडने कोटय़वधींची माया जमवल्याची माहिती समोर येत आहे. नोकरीचे आमिष दाखवून मुलांकडून पैसे घेऊन त्याने नागपूर अमरावती येथे अनेक ठिकाणी जमिनी घेऊन ठेवल्या आहेत. विशेष म्हणजे, कुठल्याही स्थायी नोकरीवर नसतानाही तीन आलिशान चारचाकी गाडय़ा आणि एखाद्या धनाढय़ व्यक्तीला लाजवेल असे त्याचे दैनंदिन जीवनमान असल्याची माहिती त्याच्या आप्तेष्टांकडून मिळाली आहे.  

निशिद हा मूळचा अमरावती येथील असून त्याच्या आई तेथील एका महाविद्यालयामध्ये प्राध्यापिका होत्या. मात्र, निशिद महाविद्यालयीन काळापासूनच गैरमार्गाने पैसे कमावणे, नोकरीचे आमिष दाखवणे, असे प्रकार करायचा. मागील दीड वर्ष तो  नागपुरात वास्तव्याला होता. स्वत:च्या व्यवसायाची खोटी माहिती देऊन त्याने नागपुरातील मोक्याच्या ठिकाणी भाडय़ाचे घर मिळवले होते. एका खासगी कंपनीमध्ये आपण मोठय़ा पदावर नोकरीला असल्याचे तो सगळय़ांना सांगत  होता. मात्र, प्रत्यक्षात या कंपनीशी निशिद संदर्भात चर्चा केली असता त्याचा या कंपनीशी कुठलाच संबंध नसल्याची माहिती आहे. कंपनीचा संचालक आणि तो एका शहरातील असल्यामुळे केवळ त्यांची ओळख असल्याचे सांगण्यात आले. अशी बनवाबनवी करीत निशिद स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मुलांना हेरत असे. त्यांना नोकरीवर लावून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याशी आर्थिक व्यवहार करीत असे. सरकारने सरळसेवा भरतीसाठी नेमलेल्या खासगी कंपनीच्या संचालकांशीही निशिदचे चांगले संबंध होते. त्यांच्या माध्यमातूनच तो परीक्षार्थीना आधीच प्रश्नपत्रिका देऊन पैसे कमावत असे. अशा गैरमार्गातूनच निशिदने कोटय़वधींची संपती जमवल्याची माहिती समोर आली आहे.

एक महिना काम, अकरा महिने आराम

निशिदकडे कुठलाही उद्योग, नोकरी नसताना त्याने इतकी माया कशी जमवली, असा सवाल त्याच्या मित्रांनी केला असता तो आपण एक महिना काम करतो आणि पुढचे अकरा महिने आराम करीत असल्याचे सांगत असे. निशिद नेमका काय काम करायचा याची माहिती आता उघड झाल्याने त्याच्या जवळच्यांनाही धक्का बसला आहे.

अनेक कंपन्यांशी संबंध

आरोग्य भरती घेणाऱ्या न्यास कंपनीच्या मालकाशी निशिदचे संबंध होते हे आता उघड झाले असले तरी ही एकच नाही तर अशा अनेक कंपन्यांशी त्याचे नजीकचे संबंध असल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे, केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर अन्य राज्यांच्या परीक्षांमध्येही त्याने गैरप्रकार घडवून आणल्याचे समजते.