लोकसत्ता टीम
नागपूर : राज्यात मुंबईनंतर सर्वाधिक ड्रग्स, गांजा, हेरॉईन, एमडी आणि चरस यासारखे अंमली पदार्थ नागपुरात तस्करी केली जाते. ड्रग्स तस्करांची राष्ट्रीय स्तरावर मोठी साखळी असून त्यांनी नागपुरातील महाविद्यालयीन युवक-युवतींना लक्ष्य केले आहे. गेल्या पाच महिन्यांत २७०० किलो गांजा आणि अन्य ड्रग्स पोलिसांनी जप्त केले. त्यापैकी राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमीत्त शहर पोलिसांनी डंम्पींग यार्डात १२०० किलो गांजा नष्ट केला.
अमली पदार्थ नष्ट करण्याची प्रक्रिया २६ जूनला भांडेवाडी येथे पार पाडण्यात आली. भारतात प्रतिबंधित असलेल्या अंमली पदार्थांमध्ये चरस, गांजा, कोकेन, हेरॉइन, एलएसडी, मॉर्फिन, अफू यांसारखी अमली पदार्थ सर्वसामान्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत. अनेकजण त्याची नशा करतात. याच अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिवसाच्या निमित्ताने नागपूर पोलिसांनी आतापर्यंत जप्त केलेला १२०० किलो गांजा नष्ट केला. उर्वरीत १५०० किलो गांजा पुढील आठवड्यात नष्ट करण्यात येईल. साडेपाच महिन्यात पोलिसांनी जवळपास तीन कोटींचे अंमली पदार्थ जप्त केले.
आणखी वाचा-नागपूर : धक्कादायक! प्रेयसीच्या कुटुंबातील चौघांवर प्रियकराचा तलवारीने हल्ला
जानेवारी ते १६ जून पर्यंत म्हणजे साडेपाच महिन्यात २५६ ड्रग्स तस्कर आणि विक्री-खरेदी करणाऱ्या आरोपींना अटक केली. अंमली पदार्थाच्या विरोधात नागपूर पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली. या ‘ऑपरेशन नार्को’मध्ये जानेवारी ते १६ जून पर्यंत पोलिसांनी २५६ जणांना अटक केली. यात गांजा- ४७, ब्राउन शुगर- २ एमडी-२४, डोडा-१ आणि १२५ व्यसनाधीनांवर कारवाई करण्यात आली.
गांजा बाळगल्याबद्दल ४७ प्रकरणांमध्ये ५५ लोकांना अटक करण्यात आली. यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त अश्वती दोरजे, अपर पोलीस आयुक्त संजय पाटील, अपर पोलीस आयुक्त शिवाजीराव राठोड यांच्यासह गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त मुमक्का सुदर्शन, परीमंडळ चारचे पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
ड्रग्स फ्री नागपूर अभियान
गेल्या एका वर्षापूर्वी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ‘ड्रग्स फ्री नागपूर’ या अभियानाची सुरूवात केली आहे. यासाठी एका संदेश देणाऱ्या पोस्टरचे उद्घाटन करण्यात आले आहे. हे पोस्टर्स अंमली पदार्थाचे ‘हॉटस्पॉट’ असलेल्या ठिकाणी लावण्यात येतील. जर कुणी ड्रग्स, गांजा विक्री-खरेदी करीत असल्यास पोस्टर्सवर दिलेल्या क्रमांकावर नागरिकांनी फोन करून माहिती देऊन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त अमितेश कुमार यांनी केले.