अकोला : महाराष्ट्राच्या राजकारणात रविवारी भूकंप आला. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी सत्तेची वाट निवडली. बंड अजित पवारांनी केले असले तरी त्यांच्यासोबत बैठकीला हजेरी लावणारे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी टीकेचे धनी ठरले आहेत. सोशल मीडियावर मिटकरींसंदर्भात तयार केलेल्या ‘मिम्स’चा धुमाकूळ उडाला. आ. मिटकरी आता काय बोलणार, असा सवाल करीत त्यांची खिल्ली उडवली जात आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी मोठी घडामोड रविवारी घडली. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीतील मोठा गट फुटला. या फोडाफोडीच्या राजकारणावरून आरोप-प्रत्यारोपाचे वाकयुद्ध रंगले आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचा सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार ‘ट्रोल’ केले जात आहे. आपल्या भाषणांच्या जोरावर सभा गाजवणाऱ्या अमोल मिटकरी यांची राष्ट्रवादीने विधान परिषद सदस्य म्हणून वर्णी लावली. अजित पवार यांच्या आग्रहामुळेच मिटकरींना ही मोठी संधी मिळाल्याचे राजकीय वर्तुळात बोलल्या जाते. आमदार झाल्यापासून मिटकरींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप नेत्यांवर हिंदुत्वाच्या मुद्द्यासह विविध कारणांवरून वारंवार टीकेची झोड उठवली होती.
हेही वाचा >>>नागपूर: तिकीट खरेदीसाठी रांगा नको,नागपूर मेट्रोचा डिजीटल पर्याय
भाजपवर तोंडसुख घेण्याची एकही संधी आ.मिटकरी सोडत नव्हते. त्यामुळे आता बदलेल्या राजकीय परिस्थितीमुळे मिटकरींची चांगलीच कोंडी झाली आहे. रविवारी त्यांनी अजित पवारांच्या बैठकीला हजेरी लावली. त्यानंतर त्यांच्यावर असंख्य ‘मिम्स’ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्या आहेत. अनेक ‘मिम्स’ अतिशय गमतीशीर असून काहींमध्ये खालच्या पातळीवर टीका-टिप्पणी करण्यात आली आहे. ट्विटरवर देखील त्यांच्या विरोधात राळ उठवली जात आहे. त्यामध्ये एका नेटकऱ्याने ‘आ.मिटकरी कुणाही भक्ताला आता ब्लॉक करणार नाही’ असे म्हटले. ‘आ.मिटकरी, स्व.सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी कधीपासून आंदोलन करणार आहेत?’, ‘आमच्याकडून पैसे घेऊन संघावर बोलणारा मिट्टू कुठाय आता?’ असे सवाल केले जात आहे. ‘बोलकरी बोला काही, यासह अनेक टोपणे सोशल मीडियातून मारण्यात आले आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी, भाजपसह इतर पक्षांच्या समर्थकांकडूनही आ. मिटकरींना लक्ष्य केले जात आहे.
हेही वाचा >>>नागपूर: विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची नियुक्ती, भाजप आमदारांचा काय आहे आक्षेप?
आ. मिटकरी म्हणतात, “आता काय बोलणार?”
राजकीय घडामोडीवर बोलण्यास मिटकरी यांनी टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला. तरी पत्रकारांनी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते म्हणाले, “आता काय बोलणार? पुढची वाटचाल पाहून नेत्यांनी हा निर्णय घेतला असावा. अजित पवार म्हणजे पक्ष व पक्ष म्हणजे अजित पवार आहेत.” अधिक भाष्य करण्याचे त्यांनी टाळले.