बुलढाणा : नूतन जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांना चंदन तस्करांनी आज अनाधिकृत सलामी दिली! या बहाद्दरांनी चक्क जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील चंदनाचे जुने झाड लंपास करून खळबळ उडवून दिली. जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी नुकतेच तर पालकमंत्री दिलिप वळसे पाटील यांनी आज गुरुवारी सूत्रे स्वीकारली. पालकमंत्र्यांच्या स्वागताची यंत्रणा तयारी करीत असताना या अजब चोरीची बाब उघड झाली. यामुळे अधिकाऱ्यांनी डोक्याला हात मारून घेतला.
जिल्हाधिकारी कक्षा समोरील उद्यानात हे झाड चोरी गेले आहे. झाडाचे अंदाजे वय २५ वर्षांचे होते व त्यात सुमारे १० किलो गाभा निघाला असावा असा अनाधिकृत अंदाज आहे. शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार प्रल्हाद काटकर यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. प्रवेशद्वारातच पोलीस कक्ष आहे. यावर कळस म्हणजे रस्ता ओलांडला की, पोलीस अधीक्षक कार्यालय आहे. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय किती सुरुक्षित? असा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामुळे तत्काळ तपासाचे आव्हान ठाणेदार काटकर यांच्या समक्ष उभे ठाकले आहे.