गडचिरोली : सूरजागड लोहखाणीमुळे चर्चेत असलेल्या दक्षिण गडचिरोली परिसरात पुन्हा चार लोह आणि एक चुनखडी अशा पाच खाणींची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यात तीन दशकांपासून प्रलंबित असलेली देवलमरी-काटेपल्ली चुनखडी (सिमेंट) खाण ‘अंबुजा’, तर सूरजागड टेकडीवरील चार लोहखाणी ‘जिंदाल’सह इतर चार कंपन्यांना पुढील प्रक्रियेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. यामुळे दक्षिण गडचिरोलीवर पुन्हा एकदा ‘खाण संकट’ ओढवल्याची भीती येथील नागरीक व्यक्त करीत आहे.
स्थानिकांच्या विरोधानंतर तब्बल दोन दशके प्रलंबित राहिलेल्या एटापल्ली तालुक्यातील सूरजागड टेकडीवर मागील दीड वर्षांपासून लोह खनिजाचे उत्खनन सुरू आहे. या यशानंतर प्रशासनाकडून जिल्ह्यातील सर्वच प्रस्तावीत खाणी सुरू करण्याच्या उद्देशाने टप्पाटप्प्यात निविदा प्रक्रिया घेण्यात येत आहेत. दोन महिन्यांपूर्वी दक्षिण गडचिरोलीतील अहेरी तालुक्यातील देवलमरी-काटेपल्ली येथील चुनखडीसह सूरजागड टेकडीवरील ६ ‘ब्लॉक’साठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. यापैकी पाच खाणींची प्रक्रिया पूर्ण झाली असून चुनखडीसाठी ‘अंबुजा प्रायव्हेट लिमिटेड’ या प्रसिद्ध कंपनीला पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरविण्यात आले आहे, तर सूरजागड येथील लोहखाणीच्या सहापैकी चार ‘ब्लॉक’साठी जेएसडब्लू (जिंदाल), सारडा (रायपूर), युनिव्हर्सल (नागपूर), ओम साईराम (जालना) या कंपन्यांना पुढील प्रक्रियेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. उर्वरित दोन ‘ब्लॉक’ची प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. सोबतच सिरोंचा तालुक्यातील उमानुर, सिरकोंडा, सुद्दागुडम आणि झिंगानुर याठिकाणी असलेल्या चुनखडीच्या खाणींसाठीदेखील सरकार आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
४५०० हेक्टर क्षेत्र खाणींनी व्यापणार
सद्यःस्थितीत सूरजागड टेकडीवर ३४८ हेक्टर वनजमीन खाणीसाठी देण्यात आली आहे. आता नव्या खाणींची कंत्राट प्रक्रिया पूर्ण झाल्याने सूरजागड टेकडीवर जवळपास ४ हजार हेक्टर तर देवलमरी – काटेपल्ली येथे ५३८ हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात येणार आहे. त्यापैकी सूरजागड टेकडीवरील पूर्ण जमीन ही वनक्षेत्रात येते. देवलमारी- काटेपल्ली ५३८ पैकी २६३ हेक्टर वनजमीन, तर २५८ हेक्टर खासगी जमीन आहे. येथे केवळ १६ हेक्टर जागा ही महसूलची आहे.
हेही वाचा – गडचिरोली : शिक्षक भरती घोटाळ्याची चौकशी अंतिम टप्प्यात! अनेक शिक्षण संस्था अडचणीत येणार
खाणींमुळे नागरिक दहशतीत
सूरजागड टेकडीवर लोहखाणीचे उत्खनन सुरू करताना परिसराचा मोठ्या प्रमाणात विकास होईल, रोजगार उपलब्ध होणार असे स्वप्न दाखविण्यात आले होते. मात्र, या परिसरातील नागरिक शेकडो अवजड वाहने, खराब रस्ते, धूळ, अपघात, कंपनी आणि प्रशासनाची अरेरावी यामुळे त्रस्त आहेत. त्यामुळे आणखी मोठ्या प्रमाणात खाणी सुरू होणार असल्याने दक्षिण गडचिरोलीतील नागरिक दहशतीत आहेत.