नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या मंत्र्यांमध्ये आदिवासी कल्याण मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांचा समावेश आहे. डॉ. उईके हे आताही प्राचार्य म्हणून नोकरी करतात. दरम्यान, मंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यावर डॉ. ऊईके यांनी प्राचार्य पदापासून स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेतला आहे.
विद्यमान आदिवासी कल्याण मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांची कुठलीच राजकीय पार्श्वभूमी नाही. यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वणी गावात त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. उच्च शिक्षण त्यांनी अमरावती जिल्ह्यात घेतले. प्राध्यापकाची नोकरी बुलढाणा जिल्ह्यात केली. ते सध्या चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. पीएचडी मिळवल्यानंतर त्यांना प्राचार्यपदी बढतीसुद्धा मिळाली आहे.
डॉ. उईके नोकरी करत असतानाच त्यांनी आमदार व्हायचा संकल्प केला होता. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथून त्यांनी २००४ आणि २००९मध्ये निवडणूक लढली. मात्र दोन्ही वेळा पराभूत झाले. त्यावेळी काँग्रेसचे या भागात मोठे प्राबल्य होते. वसंत पुरके यांच्या सारखा विद्याविभूषित उमेदवार त्यांच्यासमोर होता. अनेकांनी नोकरी कर निवडणूक लढून पैसे खर्च करू नको, असाही सल्ला त्यांना दिला होता. मात्र उईके ठाम होते. त्यांना आपला संकल्प पूर्ण करायचा होता.
२०१४ च्या निवडणुकीत त्यांचा संकल्प पूर्ण झाला. ते आमदार म्हणून प्रथमच निवडून आले. तेव्हापासून सलग तीन निवडणुका त्यांनी जिंकल्यात. अडीच वर्षांच्या महायुतीच्या कार्यकाळात शेवटच्या टप्प्यात त्यांना मंत्री करण्यात आले होते. मात्र फारच कमी कालावधी मिळाल्याने त्यांना काहीच करता आले नाही. आता त्यांना फडणवीस सरकारमध्ये आदिवासी कल्याण विभागाची जबाबदारी मिळाली आहे. त्यामुळे ते स्वच्छानिवृत्ती घेणार असल्याचे त्यांनी नागपुरातील प्रेस क्लबमध्ये झालेल्या अनौपचारिक चर्चेत सांगितले.
आदिवासी समाज भाजपसोबत केंद्राप्रमाणे आदिवासी आयोग स्थापन करावा, अशी त्यांनी राज्य सरकारकडे विनंती केली आहे. भाजप महायुतीच्या विजयात आदिवासी समाजाच मोठा वाटा आहे. भाजपने देशाच्या सर्वाैच्च पदावर राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांना बसवले, आदिवास समाजाला गौरव मिळवून दिला. त्यामुळे आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात भाजपसोबत जुळला असल्याचे उईके यांचे म्हणणे आहे.