देवेंद्र गावंडे
मराठी भाषा खात्याचे मंत्री दीपक केसरकर विदर्भात येत आहेत. आता तुम्ही म्हणाल की, यात काय नवीन? केसरकर संपूर्ण राज्याचे मंत्री आहेत व विदर्भ हा राज्याचा अविभाज्य घटक आहे, त्यामुळे त्यांचे दौरा करणे साहजिकच. हो, हे खरे आहे पण ते हेच केसरकर आहेत ज्यांनी विदर्भाला विश्व मराठी संमेलनातून डावलले. आता तेच वर्ध्यात भरणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला हजेरी लावणार आहेत. त्यामुळे सर्व वैदर्भीयांना विनंती अशी की या आगमनाच्या निमित्ताने त्यांचा एक सत्कार घडवून आणावा. प्रामुख्याने विदर्भातील साहित्य क्षेत्रातील संस्थांनी, लहानथोर अशा सर्व साहित्यिकांनी या कामी पुढाकार घ्यावा. केसरकरांनी विदर्भाला डावलले म्हणून त्यांचा राग करणे, त्यांना काळे झेंडे दाखवणे, त्यांना शिव्यांची लाखोली वाहणे असल्या अपमानजनक कृत्यांची अजिबात गरज नाही. त्यांचा सत्कार आयोजित करून त्यांना सौम्य भाषेत विदर्भ सारस्वतांची कशी खाण आहे, या भूमीत शेकडो वर्षांपासून आजवर कोणकोणते सरस्वतीपुत्र जन्माला आले, त्यांनी मराठीसाठी काय योगदान दिले, त्यांनी किती पुस्तके लिहिली, आजच्या घडीचे मोठे वैदर्भीय साहित्यिक कोण याची माहिती जाहीरपणे द्यावी.
आता काही जण म्हणतील हा सभ्य भाषेत केलेला अपमानच. पण, तसे नाही. मुळात केसरकर हे गृहस्थ म्हणून अतिशय सभ्य, शांत व मृदू स्वभावाचे आहेत. त्यामुळेच त्यांचे राणे कुटुंबाशी पटले नाही. अशी सौजन्यपूर्ण वागणारी व छोट्या पडद्यावर अतिशय मृदू भाषेत बोलणारी माणसे अन्यायकारक वागू शकतात का हा ज्याचा त्याने सोडवायचा प्रश्न. मात्र अशांवर आगपाखड करण्यापेक्षा त्यांना प्रेमाने वस्तुस्थितीची जाणीव करून देणे केव्हाही योग्य. म्हणूनच आम्ही सत्कार सुचवत आहोत. हे केसरकर मूळचे कोकणातले. म्हणजे विदर्भापासून दूरच्या टोकावर असलेल्या प्रदेशाचे. गेली काही वर्षे ते मंत्री आहेत. तेही राज्याचे. त्यामुळे त्यांना संपूर्ण राज्य कळले असे समजण्याचे काही कारण नाही. मंत्रीपदाचा व्यापच एवढा मोठा असतो की अनेकदा राज्याच्या प्रत्येक प्रदेशाचा इतिहास, भूगोल समजून घेण्यात अडचणी येतात. कदाचित त्यांच्याही बाबतीत हे घडले असावे. त्यातल्या त्यात कोकणच्या माणसाचा संबंध येतो तो मुंबईशी. एकदा तिथे स्थिरावले की पुणे, नाशिक, ठाणे व जास्तीत जास्त नगरपर्यंत महाराष्ट्र पसरला आहे असा भास होऊ लागतो. केसरकरांना सुद्धा या भासाची बाधा झाली असावी. अन्यथा ते संमेलनात वैदर्भीयांचा सहभाग हवा असा आग्रह धरते झाले असते. त्यामुळे या भासबाधित मंत्र्यांची बाधा उतरवण्यासाठी सत्कार आवश्यक ठरतो. हे विश्व संमेलन कुण्या संस्थेने घेतले असते तर त्यांच्याकडून होणारा अन्याय विदर्भाने समजून घेतला असता. अशा अन्यायाची सवय या भागाला आहेच पण हे संमेलन चक्क सरकारने घेतले. सरकार हे संपूर्ण राज्याचे असते असा विदर्भाचा समज आहे. त्यामुळे अन्याय झालाच कसा असा प्रश्न अनेकांना पडलेला. त्याचा उलगडा केसरकर सत्काराला उत्तर देताना करतील, अशी अपेक्षा बाळगायला काही हरकत नाही. ते असेही म्हणून शकतात की संमेलन घेण्याचा निर्णय माझा पण ते यशस्वी करणे, त्यात सर्व राज्यातील मान्यवरांना सहभागी करून घेणे हे खात्याचे काम. त्यांनी कर्तव्यात कसूर केली असेल तर मी दोषी कसा? हा त्यांचा सवाल रास्तच असू शकतो. मात्र याच खात्याच्या प्रधान सचिव मनीषा पाटणकर आहेत. त्या विदर्भकन्या. राज्यात भाजपचे सरकार आले की त्यांच्या विदर्भप्रेमाला अक्षरश: बहर येत असतो. त्यांनीही विदर्भावर अन्यायाची गोष्ट केसरकरांच्या लक्षात आणून दिली नसेल काय?
आता याही प्रश्नाचे उत्तर हवे असेल तर पाटणकरांना सुद्धा या सत्कार कार्यक्रमात बोलवायला हवे. विदर्भाची माणसे मुंबईत स्थिरावली की इकडच्यांना विसरून जातात हा आजवरचा अनुभव. तो खोटा आहे हे सिद्ध करण्यासाठी प्रधान सचिव असलेल्या पाटणकरांची हजेरी आवश्यक. आता कुणी म्हणेल की केसरकरांचा हा भव्यदिव्य सत्कार कुणाच्या हस्ते घडवून आणायचा? दोन महनीय आहेत त्यासाठी. एक आपले देवेंद्रभाऊ व दुसरे सुधीरभाऊ. कारण हे दोघेही या संमेलनाला हजेरी लावून आले. तसे हे दोघे केसरकरांपेक्षा ज्येष्ठ. त्यामुळे त्यांनी भर संमेलनात केसरकरांना विदर्भ यात का नाही असा प्रश्न विचारला की नाही हे अजून कळलेले नाही. त्याचा उलगडा होण्याच्या दृष्टीने या दोघांची पाहुणे म्हणून निवड सर्वार्थाने योग्य ठरते. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा. केसरकर असेही म्हणून शकतात की हे संमेलन विश्वव्यापी होते. त्यात जगभरातील मराठी सारस्वतांना सामावून घेणे महत्त्वाचे होते. त्यामुळे विदर्भ मागे पडला. हे जर खरे समजायचे तर या जागतिक साहित्यिकांच्या शेजारच्या खुर्चीत मुंबई, पुण्याच्या साहित्यिकांना बसवण्यामागची नेमकी भूमिका कोणती होती? याच्या उत्तरासाठी सुद्धा हा सत्कार आवश्यक. याच कार्यक्रमात विदर्भातील साहित्याची थोर परंपरा सांगणारा एखादा दृकश्राव्य कार्यक्रम करायचा का यावर आता समस्त वैदर्भीय साहित्य वर्तुळाला विचार करायचा आहे. या कार्यक्रमाचे सादरीकरण करताना त्यात काही कोकणी शब्द आले तरी चालतील. त्यामुळे केसरकरांना विदर्भ व कोकणात बरेच साम्य आहे असा साक्षात्कार होईल व पुढे ते मराठीच्या विकासासाठी झटताना विदर्भाला विसरणार नाहीत. हा कार्यक्रम विदर्भाचा साहित्यिक इतिहास सांगणारा सुद्धा असावा. म्हणजे त्यात कालिदास, भवभूती, महानुभाव साहित्य याच्यासह अलीकडच्या राम गणेश गडकरीपर्यंतचा समावेश असेल. शिवाय वर्तमानातले मोठे वैदर्भीय साहित्यिक कोण याचीही ओळख यातून केसरकरांना करून देणे गरजेचे. त्यामुळे त्यांना जागतिक कीर्तीचे नाटककार महेश एलकुंचवार, साहित्य अकादमी विजेत्या आशा बगे विदर्भात राहतात याचे ज्ञान प्राप्त होईल. साऱ्या मराठी विश्वाला वेड लावणारे सुरेश भट, ग्रेस हे कवी, निरुपणकार राम शेवाळकर विदर्भात होऊन गेले याचीही माहिती केसरकरांना व्यासपीठावर बसल्या बसल्या कुणीतरी द्यावी. सेवाक्षेत्रात असले तरी त्यावर आधारित अनुभवांवर लिहून विक्रमी खपांच्या पुस्तकांचे लेखक ठरलेले अभय बंग व प्रकाश आमटे इकडेच राहतात याचेही दिव्यज्ञान केसरकरांना प्राप्त होईल. मग ते काय बोलतात याची उत्सुकता साऱ्यांना असेल.
वर्ध्याच्या संमेलनाच्या मागेपुढेच हा कार्यक्रम होणे गरजेचे. कारण या संमेलनाचे अध्यक्ष चपळगावकर असल्याने मराठवाड्यातील अनेक साहित्यिक इकडे आलेले असतील. काही महिन्यापूर्वी याच मराठवाड्यातील एका महनीय वैगेरे असलेल्या समीक्षकांनी साहित्य संघाच्या व्यासपीठावर ‘विदर्भात लेखकच नाहीत’ असे विधान केले होते. त्यामुळे त्यांनाही केसरकरांच्या संगतीने व्यासपीठावर स्थान देता येईल. तेव्हा विदर्भातील साहित्य संस्थांनो, या योग्य संधीचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे व केसरकरांना सत्कार स्वीकारूनच परत जावा अशी गळ घालावी ही विनंती. अन्यायावरून कुढत बसण्यापेक्षा अशी आरसा दाखवणारी कृतिशीलता केव्हाही परवडणारी!
devendra.gawande@expressindia.com