बुलढाणा: राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज गुरुवारी बुलढाणा पोलीस ठाणे गाठून चक्क जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे बेपत्ता असल्याची तक्रार केली. ही तक्रार समाजमाध्यमांवर प्रसारित होताच जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शहराध्यक्ष अनिल बावस्कर यांनी सहकाऱ्यांसह आज २० ऑक्टोबरला बुलढाणा शहर पोलीस ठाणे गाठले. हे पदाधिकारी कोणत्या कामासाठी आले असावे, असा प्रश्न पोलिसांना पडला. मात्र त्यांनी चक्क पालकमंत्री बेपत्ता असल्याची तक्रार दिल्याने व त्यांना शोधून आणण्याची अजब मागणी केल्याने पोलिसही थक्क झाले.
हेही वाचा >>> चंद्रपूर: वाघाच्या हल्ल्यात महिला शेतकरी ठार; चार दिवसात चार जणांचे बळी
या तक्रारीत नमूद आहे की, शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक महिने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनीच कारभार चालवला. एकाही जिल्ह्याला पालकमंत्री नव्हते, त्यामुळे विविध जिल्ह्यातील कामे पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे पालकमंत्री द्यावे, अशी मागणी सर्व स्तरातून होऊ लागल्याने नवीन पालकमंत्र्यांची घोषणा झाली. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्याचे पालकत्व गुलाबराव पाटील यांच्याकडे देण्यात आले मात्र एकदाच राजकीय कार्यक्रमानिमित्त आलेले पालकमंत्री नंतर जिल्ह्यात फिरकलेच नाहीत. त्यामुळे पालकमंत्री कुठेतरी बेपत्ता झाले आहेत, त्यांचा पोलिसांनी तात्काळ शोध घ्यावा अशी मागणी करत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आमच्या पालकमंत्र्यांना तात्काळ शोधून आणावे अशी मागणी शहराध्यक्ष बावस्कर, राजेश गवई, मंगेश बिडवे, सत्तार कुरेशी, संदीप तायडे, नाझीमा इसहाक खान, संतोष पवार, फदाट यांनी केली आहे.