बुलढाणा : राज्याचे गृह(ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री पंकज भोयर हे मंगळवारी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी शेगावला संत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. दुपारी ते सपत्नीक संत गजानन महाराज यांच्या मंदिरात पोहचले. यावेळी त्यांच्यासोबत वर्धा जिल्ह्यातून आलेल्या दीडशे दिव्यांग होते .या सर्वांनी दर्शन घेतले.
श्री गजानन महाराज संस्थानच्या सेवा कार्याची माहिती घेतली. त्यानंतर आपल्या परिवार व वर्ध्याहून आलेल्या दीडशे दिव्यांग बांधवांसोबत महाप्रसादाचा लाभही घेतला.एरवी मंत्र्यांच्या भोजना ची बडदास्त शासकीय विश्रामगृह वा सुसज्ज हॉटेलमध्ये केली जाते. मात्र शाही जेवण घेण्याचे टाळून मंत्र्यांनी संस्थानच्या महाप्रसादालय मध्ये इतर हजारो भाविका प्रमाणे मोफत प्रसादचा आस्वाद घेतला.
यावेळी गजानन महाराज संस्थांनाच्या वतीने त्यांचे यथोचित सपत्नीक स्वागत सत्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा निबंधक (सहकारी संस्था )नानासाहेब चव्हाण , आशिष वाघ, उपशिक्षणाधिकारी, (माध्यमिक) जिल्हा परिषद बुलढाणा, अनिल देवकर, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) बुलढाणा, मंगेश भोरसे, सहायक कार्यक्रम अधिकारी, शेगाव पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी श्रद्धा वायदंडे आदींची उपस्थिती होती.