नागपूर : एसटी महामंडळाच्या आर्थिक स्थितीवर श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला आहे. त्यावर एसटी महामंडळातील कामगार संघटनेने भाष्य केले आहे. त्याबाबत आपण जाणून घेऊ या. महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे म्हणाले, एसटी महामंडळ अनेक वर्षांपासून आर्थिक अडचणीत आहे. त्याची आर्थिक स्थिती समजणे, त्यावर अभ्यास करून मार्ग काढण्यासाठी श्वेतपत्रिकेची मागणी आम्ही गेले २५ वर्ष करीत आहोत. त्यामुळे महामंडळाला त्याचा लाभ होणे अपेक्षित आहे. दरम्यान एसटी महामंडळाच्या आर्थिक स्थितीवर श्वेत पत्रिका काढण्याचे निर्देश काल महामंडळाच्या खाते प्रमुखांच्या सोबत झालेल्या आढावा बैठकीत परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले. त्यावर प्रतिक्रिया देताना बरगे यांनी म्हटले आहे की, १० हजार कोटी रुपयांचा संचित तोटा व ७ हजार कोटी रुपयांची कर्मचाऱ्यांची व महामंडळा समोर असलेली थकीत देणी यावर मार्ग काढण्याच्या दृष्टीने व भविष्यासाठी हा निर्णय क्रांतिकारी ठरेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला आहे.

एसटी महामंडळाला दर महिन्याला कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी करावी लागणारी कसरत, वाहन खरेदी, टायर खरेदी, इंधन खरेदी, स्थानकाचे नूतनीकरण व इतर आस्थापना खर्चासाठी सुद्धा प्रशासनाची दर महिन्याला आर्थिक ससेहोलपट होत आहे. कर्मचाऱ्यांची देणी, भविष्य निर्वाह निधीचे हप्ते न भरणे, कामगार वेतनवाढ फरक, महागाई भत्ता फरक रक्कम, घरभाडे भत्ता फरक रक्कम व प्रलंबित देणी या साठी महामंडळाला निधीची गरज आहे. याबरोबरच महामंडळाला इंधन, वस्तु व सेवा पुरविणाऱ्या संस्थांची थकीत देणी या सर्व घटकांचा विचार करून एसटी महामंडळाचे सध्याचे उत्पन्न व याचा ताळमेळ घालून लेखा- जोखा मांडणे गरजेचे होते त्याला या निर्णयाने बळकटी मिळेल असेही बरगे यांनी म्हटले आहे.

सल्लागार नेमण्याची संकल्पनेमुळे…

भाडेवाढ होऊनही अपेक्षित उत्पन्न व प्रवासी संख्येत वाढ करण्यात एसटी प्रशासन सपसेल अपयशी ठरल्याचे दिसत असून कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्याच प्रमाणे वेगवेगळ्या संकल्पना व ब्रँड आणून प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी व इतरही बाबतीत सुद्धा नवनवीन योजना तयार करण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील तज्ञांच्या सल्ल्याची या परिस्थितीत गरज असून परिवहन मंत्र्यांचा हा निर्णय सुद्धा स्वागतार्ह्य असल्याचे बरगे यांनी म्हटले आहे.