नागपूर : सभागृहात सोमवारी कर्नाटक सरकारपेक्षाही प्रभावी प्रस्ताव आणणार आहोत, अशी माहिती राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तसेच महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद समन्वय समितीचे सदस्य शंभूराज देसाई यांनी विधान भवन परिसरात प्रसिद्धी माध्यमांशी बोलतांना दिली.
शंभूराज देसाई पुढे म्हणाले, विधानसभेच्या विद्यमान सदस्य मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे शोक प्रस्ताव आज सभागृहात मांडण्यात आला. शोक प्रस्तावानंतर सभागृहाचे कामकाज आपण करीत नाही. त्यामुळे सोमवारी हा प्रस्ताव मांडला जाईल.
राज्य सरकारच्या भूमिकेचा विस्तृत समावेश या प्रस्तावात असेल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या समक्ष दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. त्यामध्ये जे ठरले त्याच्या नेमके उलट वर्तन कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याचे आहे. हे अतिशय चुकीचे आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या समोर घडलेल्या बाबीसुद्धा कर्नाटकचे मुख्यमंत्री पाळत नसतील, तर केंद्राच्या सूचनांचे उल्लंघन कोण करतेय, खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे कुणाचे आहेत, हे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या कृतीवरून स्पष्ट झालेले आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांची आजही भूमिका आहे की हा प्रश्न सुटला पाहिजे, त्यांच्या राज्यातील असो वा आपल्या राज्यातील असो कुणालाही या सीमावादात हिंसा नको आहे. आज शोकप्रस्ताव झाल्यानंतर चंद्रकांत पाटील आणि मी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी प्रस्तावासंदर्भात चर्चा करणार आहोत. तसेच कर्नाटकच्या ठरावाबद्दलची तीव्र नाराजी केंद्राला कळविणार आहोत, असे शंभूराजे देसाई यांनी सांगितले.