नागपूर : महाराष्ट्र पोलिसांबाबत आक्षेपार्ह विधान करणारे बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कान टोचल्यानंतर शिंदे गटाचेच मंत्री उदय सामंत यांनीही पोलिसांबाबत अशा प्रकारचे विधान करणे अयोग्य असल्याचे मत रविवारी नागपुरात व्यक्त केले.

उद्योग मंत्री रविवारी नाट्य संमेलनाच्या समारोपासाठी नागपुरात आले होते. त्यावेळी पत्रकारांनी त्यांचे लक्ष आ. गायकवाड यांच्या विधानाकडे वेधले असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे.त्यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणे अयोग्य आहे. आ. संजय गायकवाड़ यांनी या प्रकरणात माफी मागितली आहे. सामंत यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली.लोकांनी ज्यांच्या पक्षाचे अस्तित्व संपुष्टात आणले, त्यांच्या टिकेबाबत प्रतिक्रिया देणे चांगले नाही. एकनाथ शिंदे शेती करायला त्यांच्या गावी गेले तरी त्यांच्यावर टीका केल जाते. ते काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांच्या मदतीला गेले तरी त्यांच्यावर टीका करण्यात आली. मात्र आता ठाकरे कुटुंबीय सहपरिवार सहलीला विदेशात गेले तरी आम्ही त्यांच्यावर टीका केली नाही., असे सामंत म्हणाले.

राष्ट्रवादीचे मंत्री झिरवळ यांनी लाडक्या बहिणींना २१०० रुपये मानधन देण्याबाबत कोणी घोषणा केली होती असा सवाल केला. त्यावर प्रतिक्रिया देताना सामंत म्हणाले, झिरवळ काय बोलले हे माहिती नाही,पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. निवडणुकीतील जाहीरनाम्यातील आश्वासनांची अंमलबजावणी पाच वर्षात करायची असते. योग्य वेळी याबाबत निर्णय घेतलता जाईल, असे सामंत म्हणाले.