लोकसत्ता टीम
नागपूर : आवडत्या मुलाबरोबर लग्नास नकार दिल्यामुळे अल्पवयीन मुलीने वडिलांवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. अमरावती सत्र न्यायालयाने याप्रकरणी दहा वर्षाची शिक्षा ठोठावली. वडिलांनी या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अपील दाखल केले. न्या. गोविंद सानप यांच्या खंडपीठासमक्ष याप्रकरणी सुनावली झाल्यावर न्यायालयाने महत्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली.
प्रकरण काय आहे?
अमरावती जिल्ह्यातील शिरखेड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत एका १४ वर्षीय मुलीने आपल्या वडीलांवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. गुन्हा नोंदविण्याच्या वेळी मुलगी नवव्या वर्गात शिकत होती. तक्रार दाखल करण्याच्या सात वर्षांपूर्वी मुलीची आई घर सोडून गेली आणि तिने दुसरा विवाह केला. यानंतर वडीलच मुलीचे संगोपन करत होते. तक्रारीनुसार, मुलगी तिसऱ्या वर्गात शिकत असताना वडीलांनी पहिल्यांदा तिच्यावर बलात्कार केला. यानंतर वडील सातत्याने तिचे लैंगिक शोषण करत राहिले. वडीलांनी जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे मुलीने याबाबत अनेक वर्ष कुणालाही माहिती दिली नाही. मात्र नवव्या वर्गात शिकत असताना तिने अखेर तिच्या आजीकडे मागील अनेक वर्षांपासून होणाऱ्या लैंगिक शोषणाबाबत माहिती दिली. यानंतर वडिलांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
आणखी वाचा-यवतमाळ : अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट ठार
याप्रकरणी अमरावतीच्या सत्र न्यायालयाने पोक्सो कायद्याच्या अंतर्गत वडीलांना दहा वर्षाची शिक्षा ठोठावली होती. वडीलांनी या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल केले. वडीलांनी मुलीने केलेले आरोप फेटाळून लावले. जवळच्या नात्यातील एका मुलासोबत मुलीला लग्न करायचे होते. मात्र वडीलांनी यावर आक्षेप नोंदविले. वडील लग्नात अडथळा ठरत असल्याने मुलीने बलात्काराची खोटी तक्रार केली असल्याचा युक्तिवाद आरोपीच्या वकीलांनी न्यायालयात केला. उच्च न्यायालयाने या युक्तिवादात तथ्य असल्याचे मान्य करत वडीलांची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले. पीडित मुलीच्यावतीने ॲड.ए.डी.टोटे यांनी बाजू मांडली. पोलिसांच्यावतीने ॲड.सोनिया ठाकूर यांनी युक्तिवाद केला.
आणखी वाचा-गृहमंत्र्यांच्या शहरात गँगवार! दोन हत्याकांडांनी नागपूर हादरले; बिट्स गँगच्या…
योग्य जोडीदार निवडण्याचा वडीलांना अधिकार
वडीलांनी लग्नाला केलेला तीव्र विरोधच या तक्रारीमागील मुख्य कारण आहे. मुलगा मुलीसाठी योग्य जोडीदार नसल्याचे वडीलांचे निरीक्षण चुकीचे नव्हते. त्या मुलामध्ये आणि मुलीमध्ये अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित झाले असल्याचे दिसत आहे. मुलीचे पालक म्हणून आपल्या मुलीसाठी योग्य जोडीदार निवडणे यासाठी वडील योग्य व्यक्ती आहेत. मुलीने आजीच्या प्रभावाखाली वडीलांवर खोटी तक्रार केली असल्याचे दिसत आहे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने निर्णय देताना नोंदविले. न्यायालयाने याप्रकरणी कारागृहात असलेल्या वडीलांची तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले.