अमरावती : शिरखेड पोलीस ठाण्‍याच्‍या हद्दीतील एका मठात सेवा देणाऱ्या अल्पवयीन मुलीवर मठाच्‍या प्रमुखासह दोघांनी अत्याचार केल्‍याची संतापजनक घटना बुधवारी उघडकीस आली. विशेष म्‍हणजे या कृत्यात पीडित मुलीच्या मावशीचाही सहभाग होता. या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून मठाचा प्रमुख आणि तिच्‍या मावशीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.

सुरेंद्रमुनी तळेगावकर बाबा (७५), बाळासाहेब देसाई (४०) व पीडित मुलीची मावशी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पीडित १७ वर्षीय मुलगी ही १ जानेवारी २०२४ पासून शिरखेड ठाण्याच्या हद्दीतील श्रीक्षेत्र असलेल्या एका गावातील सुरेंद्रमुनी तळेगावकर याच्या मठात राहते. ती तिच्या मावशीसोबत मठात सेवा करते. दरम्यान, २ एप्रिल २०२४ रोजी पीडित मुलगी ही मावशी व मठातील इतर मुली, महिलांसोबत झोपली होती. रात्री १२ वाजताच्या सुमारास मावशीने तिला झोपेतून उठविले.

बाबा तुला मठाच्या खाली तळघरात बोलावित आहे, असे मावशीने तिला म्हटले. त्यानुसार ती तळघरात गेली. त्यावेळी सुरेंद्र मुनी तळेगावकर (बाबा) याने बळजबरीने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मुलीने विरोध केल्यावर त्याने तिला मारहाण केली. गळ्यावर पाय ठेवून कुणाला काहीही सांगितले, तर जिवाने मारून टाकेन, अशी धमकी त्याने तिला दिली. दरम्यान, सुरेंद्रमुनीच्या तावडीतून सुटल्यावर पीडित मुलीने आपबिती मावशीकडे कथन केली. मात्र, मावशीने या कृत्याचे समर्थन करीत याबाबत कुणाला काहीही सांगू नको, असे तिला बजावले. त्या दिवसापासून पीडित मुलीला मठाच्या बाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला. त्यानंतर मावशी बळजबरीने तिला सुरेंद्र मुनीकडे तळघरात पाठवायची आणि तो तिच्यावर अत्याचार करीत होता.

दरम्यान, नांदेड येथील बाळासाहेब देसाई हा मठामध्ये दर्शनाकरिता आल्यावर सुरेंद्र मुनी व मावशी हे दोघेही तिला जबरीने तळघरात घेऊन जायचे. तेथे बाळासाहेब देसाईसुद्धा तिच्यासोबत जबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होता. या अत्याचारातून पीडित मुलीला गर्भधारणा झाली. त्यामुळे तिने याबाबत मावशीला सांगितले. त्यावर मावशी तिला रुग्णालयात घेऊन गेली.

सोनोग्राफी केल्यावर ती गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे पीडित मुलीने आपबिती आपल्या मामाकडे कथन केली. त्यामुळे मामाने सुरेंद्रमुनी याला याबाबत जाब विचारला. त्यावर सुरेंद्रमुनीने मामाला मारहाण केली. आणि तिच्यासह मामाला मठातून हाकलून दिले. त्यानंतर पीडित मुलगी ही आपल्या आईसह नातेवाइकाकडे निघून गेली. नंतर तिने आपल्यावर झालेल्या अत्याचाराबाबत वडिलांना सांगितले. त्यानंतर पीडित मुलीने शिरखेड ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

Story img Loader