लोकसत्ता टीम
नागपूर : गावातील एका १५ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर प्रियकरासह सात जणांनी बलात्कार केला. मुलीचे अश्लील छायाचित्र आणि चित्रफिती बनवून मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रूपवर प्रसारित केल्या. तर अन्य पाच आरोपींनी छायाचित्र दाखवून शारीरिक संबंधासाठी जबरदस्ती केली. याप्रकरणी खापा पोलिसांनी १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या एका गावातील पीडित १५ वर्षीय मुलगी दहावीत शिकते. तिचे आईवडिल मजुरी करतात. गावातच राहणारा मुख्य आरोपी धीरज हिवरकर याने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. २ मार्चला तिला घराशेजारी असलेल्या पडक्या घरात नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
आणखी वाचा-जावयाचा सासुरवाडीस हिसका, केले असे की…
तिला लग्न करण्याचे आमिष दाखवले. धीरजच्या आमिषाला बळ पडलेल्या मुलीने अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र, धीरजने शारीरिक संबंध ठेवताना मोबाईलने चित्रफिती बनवल्या आणि तिचे नग्न छायाचित्र काढले. त्याने मित्र गोलू लिखार, वेदू आवते, लिलाधर चौरागडे या तिघांना प्रेयसीचे अश्लील छायाचित्र व्हॉट्सअपवर पाठवले. तिघांनीही तिला दुपारी गावाबाहेर बोलावले आणि छायाचित्र दाखवून तिघांनी मुलीवर सामूहिक बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी गोलूने तिला पुन्हा घरी बोलावले आणि तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर त्याने अन्य मित्र निखिल धांदे, गौरव खुबाळकर, सुशिल धार्मिक या तिघांशी शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले. तिने नकार दिला असता तिचे छायाचित्र गावात दाखविण्याची धमकी दिली.
तिनही मित्रांनी मुलीवर सामूहिक बलात्कार केला. काही दिवसांतच प्रियकर धीरज आणि गोलू लिखार यांनी गावातील मित्र विकास हेडाऊ, विक्की लिखार, स्नेहल सुरकार आणि प्रणय टेकाडे यांच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केली. वरील सर्व आरोपींनी एका व्हॉट्सअप ग्रूपवर मुलीचे अश्लील छायाचित्र प्रसारित केले. वरील आरोपींनीही शारीरिक संबंध न ठेवल्यास वडिलांना छायाचित्र दाखविण्याची धमकी दिली. गावात मुलीची बदनामी झाली आणि तिचे अनेक जण लैंगिक शोषण करीत होते. गावातील १२ युवकांकडून लैंगिक संबंधाच्या मागणीने त्रस्त झालेल्या मुलीची मानसिक स्थिती आणि प्रकृती बिघडली. तिच्या आईने तिला रुग्णालयात दाखवले. तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे आईने तिची आस्थेने चौकशी केली. वारंवार सामूहिक बलात्कार होत असल्याची माहिती तिने आईला सांगितली. तिच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली.
आणखी वाचा-पावसाच्या तडाख्यात महावितरणला ४५ लाखांचा फटका; अडीचशे मीटरमध्ये पाणी अन..
आईने मुलीला घेऊन खापा पोलीस ठाणे गाठले. मात्र, पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत होते. त्यामुळे गावातील प्रतिष्ठीत नागरिकांनी पोलिसांनी खापा पोलीस ठाण्याला घेराव घातला. वाढता दबाव बघता ठाणेदार मनोज खडसे यांनी गुन्हा दाखल केला. सहा आरोपींना अटक केली असून सहा जण फरार आहेत. संवेदनशिल प्रकरणातसुद्धा पोलीस ताठर भूमिका घेत असल्यामुळे खापा पोलिसांबाबत गावकऱ्यांमध्ये रोष आहे.