अकोला : वाशीम जिल्ह्याच्या रिसोड शहरात चाकूचा धाक दाखवून एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणात आरोपीची ओळख पटली असून त्याच्या शोधासाठी आठ पोलीस पथके रवाना झाली आहेत. वाशीम जिल्ह्यात २४ तासांमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
पुणे येथील स्वारगेट बसस्थानकावर बंद बसमध्ये तरुणीवर अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्र हादरला असतानाच वाशीम जिल्ह्यात देखील दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या वेगवेगळ्या घटना समोर आल्या आहेत. सात वर्षीय चिमुकली आईस्क्रीम आणण्यासाठी दुकानात गेली.
दुकानातील १९ वर्षीय तरुणाची वाईट नजर त्या चिमुकलीवर पडली. सात वर्षीय चिमुकलीवर १९ वर्षीय तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना वाशीम शहरात घडली. पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून वाशीम शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. दरम्यान, दुसऱ्या घटनेत रिसोड शहरातील वाशीम मार्गावर एका १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचे चाकूच्या धाकावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. ही अल्पवयीन मुलगी शिक्षणासाठी आपल्या मामाकडे राहते. काल दुपारी संगणकाचा शिकवणी वर्ग आटोपून ती बाहेर आली. त्यावेळी आरोपीने त्या अल्पवयीन मुलीवर पाळत ठेऊन तिला एकटीला गाठले.
‘तुझ्या मामाने मला तुला नेण्यासाठी पाठवले, मी तुझ्या मामाच्या ओळखीचा आहे,’ अशी बतावणी करून आरोपीने तिला ऑटो रिक्षामध्ये बसवले. वाशीम मार्गावरील सवड गावा जवळील शेतशिवारात आरोपी अल्पवयीन मुलीला घेऊन गेला. यावेळी आरोपीने चाकूचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. घटनास्थळी अल्पवयीन मुलीला एकटीला सोडून तो फरार झाला. पीडित मुलीने घर गाठून घडलेला सर्व प्रकार नातेवाईकांना सांगितला. कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. पीडित मुलीसह कुटुंबीयांनी तत्काळ पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणात फिर्याद दाखल केल्यावर पोलिसांनी तपास सुरू केला. या प्रकरणी रिसोड पोलिसात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद
अल्पवयीन मुलीची दिशाभूल करून तिला घेऊन जातांना आरोपी सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. त्यावरून पोलिसांनी आरोपीला निष्पन्न केले असून त्याचा शोध घेण्यासाठी आठ पथके विविध मार्गाने रवाना केले आहेत. आरोपीवर या अगोदरही बलात्कार सारख्या गंभीर गुन्ह्याची नोंद असल्याची माहिती समोर येत आहे.