लोकसत्ता टीम
बुलढाणा: साडेसतरा वर्षीय अल्पवयीन मुलाला जन्मदात्या बापाच्या खुनाप्रकरणी अटक करण्यात आली आहे. शवविच्छेदन अहवाल वरून पोलिसांनी ही कारवाई केली.
राजू लक्ष्मण पेंढारकर( वय ४०, मंडपगाव ता देऊळगाव राजा) असे मृतक इसमाचे नाव आहे. मुर्त्या विकण्याचा त्यांचा धंदा होता. त्याच्या हत्येच्या आरोपावरून मृतकचा मुलगा गणेश पेंढारकर (१६) याला अटक करण्यात आली. राजू हा अट्टल दारुड्या होता. यामुळे तो पत्नीला व मुलांना मारहाण, शिवीगाळ करायचा. ही नेहमीची बाब झाली होती. घरचेच काय शेजारी पाजारी देखील त्याच्यामुळे वैतागले होते. मागील ५ जून रोजी दारू पिऊन आलेल्या राजू ने पुन्हा गोंधळ घातला. यामुळे राग अनावर झालेल्या गणेशने हातातील मूर्ती पित्याच्या डोक्यात घातली. यामुळे जागीच खाली कोसळलेल्या राजुला देऊळगाव मही येथील शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
हेही वाचा… नवीन घरात गृहप्रवेशाची इच्छा अपूर्णच.. नागपूर पोलिसाचा मध्यप्रदेशात अपघाती मृत्यू
९ जून ला प्राप्त शवविच्छेदन अहवालात राजूचा मृत्यू डोक्याला झालेल्या गंभीर दुखापत मुळे झाल्याचे स्पष्ट झाले. यावरून अंढेरा पोलिसांनी आरोपी पुत्रास ९ जूनच्या रात्री उशिरा ताब्यात घेतले. मृतकच्या भाच्याने दिलेल्या तक्रारीवरून कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .