नागपूर : एका अल्पवयीन विद्यार्थ्याची त्याच्याच मित्राने शीतपेयामध्ये  विष मिसळून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हत्येनंतर आरोपी मित्राने विद्यार्थ्याच्या घरी पार्क केलेल्या गाडीवर एक पत्र लावून खंडणी मागण्याचा प्रयत्नही केला. ही घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या निळकंठ नगरमध्ये घडली आहे. चार दिवसांनंतर हा प्रकार समोर आला.

वेदांत ऊर्फ विजय कालिदास खंडाते (१७) असे मृताचे नाव आहे तर त्याचा मित्र मिथिलेश चकोले (१८) हा आरोपी आहे. वेदांतने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. त्याचे वडील तंत्रज्ञ असून त्याला बहीणदेखील आहे. त्याच्या वडिलांनी काही दिवसांअगोदर वडिलोपार्जित शेती विकली. वर्षभराअगोदर ते निळकंठनगरमध्ये रहायला आले. त्यानंतर मिथिलेश व वेदांत चांगले मित्र बनले. वेदांतच्या कुटुंबाकडे पैसा आल्याची माहिती मिथिलेशला होती. मिथिलेश एका गरीब कुटुंबातील आहे व त्याला वेदांतच्या समृद्धीचा हेवा वाटू लागला. कमी वेळात श्रीमंत होण्याच्या विचारातून त्याने खंडणी उकळण्याचा कट रचला. ८ एप्रिल रोजी मिथिलेशने वेदांतला कोल्ड्रिंक पिण्यास जाऊ असे म्हटले. ते एका पानटपरीवर गेले व तेथून कोल्ड्रिंक घेतले. वेदांतच्या नकळत त्याला बेशुद्ध करण्यासाठी मिथिलेशने त्यात झुरळ मारण्याचे औषध मिसळले. ते कोल्ड्रिंक पिल्यावर काही वेळातच वेदांतची प्रकृती बिघडली. त्याच्या कुटुंबीयांनी त्याला सक्करदऱ्यातील एका खासगी इस्पितळात दाखल केले. पोलिसांनी एमएलसीच्या आधारे त्याच्या कुटुंबीयांचा जबाब नोंदविला होता.

दरम्यान, १० एप्रिल रोजी वेदांतच्या वडिलांना गाडीच्या बोनेटवर एक पत्र सापडले. त्यात नमूद केले होते की काही दिवसांपूर्वी पिकांच्या विक्रीतून भरपूर पैसे मिळाले असून खंडणीची रक्कम एका ढाब्यावर पोहोचविण्याचे त्यात नमूद होते. पत्र मिळाल्यानंतर वेदांतच्या कुटुंबाला धक्का बसला. दरम्यान, शनिवारी सकाळी वेदांतचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांनी हुडकेश्वर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता.

कोल्ड्रिंग मध्ये टाकले विष

मिथिलेशनेही वेदांतसोबत कोल्ड्रिंक प्यायले होते व त्याला काहीही झाले नव्हते. पोलिस चौकशीतही मिथिलेशने तोंड उघडले नाही. पोलिसांनी आत्महत्येच्या दिशेने तपास सुरू ठेवला. शवविच्छेदन अहवालात वेदांतला विषबाधा झाल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी मिथिलेशला परत चौकशीला बोलविले. त्याला पोलिसी खाक्या दाखविल्यावर त्याने हत्येची कबुली दिली.