अकोला : गैरसमजामुळे गुदाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये वाढले आहे. भारतात हजारांमध्ये दोन कर्करोगाचे रुग्ण आढळतात. कर्करोगामुळे होणाऱ्या गंभीर अवस्थेला प्रभारी जनजागृतीतून नियंत्रण मिळवता येऊ शकते, अशी माहिती डॉ. सुभाष राठोड यांनी दिली. कर्करोगामुळे आयुष्य संपल ही धारणा सर्वच रुग्ण किंवा कुटुंबाची होऊन जाते. पूर्वी या आजारावर उपचार उपलब्ध नव्हते. आता विज्ञानाने मोठी झेप घेतली. कर्करोगासारखे गंभीर व घातक आजार सुद्धा बरे होतात. या आजाराचे निदान लवकर होणे महत्त्वाचे आहे. निदान लवकर न होणाऱ्यामध्ये गुदाशयाचा कर्करोग आहे.

हेही वाचा…दिल्ली एम्सच्या धर्तीवर आता नागपुरातही ‘शरीराची चिरफाड न करता शवविच्छेदन’!

गुदद्वाराचा कर्करोग ३५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांमध्ये दुर्मीळ आहे. मुख्यतः वृद्ध, प्रौढांमध्ये आढळतो. गुदद्वाराच्या कर्करोगाचे निदान होण्याचा धोका ५०० पैकी १ असतो. शौचाद्वारे रक्तस्त्राव, गुदभागी वेदना किंवा मलावरोध झाला की लगेच रुग्णाला मुळव्याधीची शंका येते. परिक्षण न करता औषधे घेण्याकडे रुग्णांचा कल असतो. कर्करोगाला मूळव्याध समजून उपचार घेणे अत्यंत धोक्याचे ठरते, अशी माहिती डॉ. सुनीती राठोड यांनी दिली.

गुदभागी १० ते ११ आजार आहेत. यामध्ये काही लक्षणे सारखीच असतात. त्यामुळे निदान व उपचार महत्त्वाचे आहेत. निश्चित निदानाअभावी एखाद्यावेळी रुग्णाला कर्करोग असला तर वेळ निघून जाते. कर्करोग अंतिम टप्प्यात जातो. गुद भागाच्या लक्षणाला गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. मूळव्याध हा हळूहळू वाढणारा, तर कर्करोग फार वेगाने वाढून लगेच अंतिम टप्प्यात जातो. अनेक वेळा या आजाराची तीव्रता वाढल्यानंतरच गुद कर्करोगाची लक्षणे समोर येतात. गुद कर्करोगाचे निदान झाल्यास ताबडतोब उपचार करून रुग्णाचा जीव वाचू शकतो, असे डॉ. राठोड यांनी सांगितले.

हेही वाचा…देवेंद्र फडणवीसांचा गडचिरोलीत ‘मॉर्निंग वॉक’, महामॅरेथॉनमध्ये सहभागी होत भयमुक्त गडचिरोलीचा नारा

कर्करोगासाठी हे आहेत घातक घटक

तंबाखू सेवन, तीव्र मद्यपान, कमी फायबर युक्त पदार्थाचे अतिसेवन, ताणतणाव, व्यायामाचा अभाव आदींमुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो. रोग प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी हळद व अद्रकचा नेहमी वापर करावा तसेच नियमित व्यायाम व ध्यान केल्याने कर्करोग आजारासोबतच इतरही गंभीर आजाराला रोखू शकतो, असे डॉ.सुभाष राठोड म्हणाले.

Story img Loader