नागपूर : हल्ली वजन कमी करण्यासाठी समाज माध्यमांवर विविध व्यायाम व आहाराबाबत चुकीची माहिती फिरत असते. त्यातून अनेकांचे वजन झटपट कमी झाले आहे. परंतु त्यामुळे काहींच्या स्नायूला नुकसान झाले आहे. तर व्यायाम थांबल्यास या व्यक्तींचे वेगात वजन वाढते, असे निरक्षण देशातील नावाजलेल्या मधूमेह व लठ्ठपणा तज्ज्ञांनी नोंदवले आहे.
नागपुरात डायबेटीस केअर फाउंडेशन ऑफ इंडियाची कार्यशाळा संपन्न झाली. त्यादरम्यान पत्रकारांशी संवाद साधतांना नवी दिल्लीतील मधुमेहतज्ज्ञ आणि रिसर्च सोसायटी फॉर द स्टडी ऑफ डायबेटीस इन इंडियाचे माजी अध्यक्ष डॉ. बी. एम. मक्कर म्हणाले, सध्या सोशल मीडियावरील ‘फॅड डाएट’कडे लोकांचा कल वाढत चालला आहे. परंतु झपाट्याने वजन कमी करण्याच्या नादात स्नायू गमावण्याचे (सार्कोपेनिया) प्रमाण वाढत आहे.
‘फॅड डाएट्स’, ‘इंटरमिटंट फास्टिंग’ आणि एकाच प्रकारच्या व्यायामामुळे तातडीने वजन कमी होते. पण यात स्नायू आणि चरबी दोन्ही कमी होतात. मात्र, जेव्हा वजन पुन्हा वाढते, तेव्हा फक्त चरबी वाढते, गमावलेले स्नायू मात्र पुन्हा मिळवण्यासाठी योग्य व्यायाम व योग्य आहार गरजेचा असते. या व्यक्तीचे वेगात वजन वाढते. कालांतराने संबंधिताने वजन कमी करण्याचे प्रयत्न केल्यास त्याला बराच कालावधी लागतो. लठ्ठपणा हा एक आजार असून त्यामुळे उच्च रक्तदाब, मधूमेहासह बऱ्याच गंभीर आजारांचा धोका वाढत असल्योचही डॉ. मक्कर यांनी सांगितले. ज्येष्ठ मधुमेहतज्ज्ञ डॉ. सुनील गुप्ता म्हणाले, महिलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण वाढले आहे. जन्माच्या वेळी बाळाचे वजन ३.५ किलोपेक्षा जास्त किंवा २.५ किलोपेक्षा कमी असेल, तर भविष्यात बाळाला लठ्ठपणाची जोखीम वाढते.
शास्त्रीय पद्धतीने वजन कमी करण्याची गरज- डॉ. नारवरिया
लठ्ठपणा तज्ज्ञानुसार, हळूहळू व शास्त्रीय पद्धतीने वजन कमी करायला हवे. प्रथम तीन महिन्यांत शरीराच्या एकूण वजनाच्या ५ टक्के वजन कमी व्हायला हवे. जर एखाद्याचे वजन १०० किलो असेल, तर पहिल्या ३ महिन्यांत ५ किलो, नंतरच्या ३ महिन्यांत ४.७५ किलो अशा टप्प्याटप्प्याने वजन कमी करायला हवे, अशी माहिती अहमदाबाद येथील बॅरियाट्रिक आणि रोबोटिक सर्जन डॉ. महेंद्र नारवरिया यांनी दिली. सोशल मीडियावर काही एकतर्फीं आहारपद्धती आणि फॅड डाएटसचे अतिप्रचार सुरू आहे. याला अनेक जण बळी पडून आपले वजन झपाट्याने कमी करतात. परंतु यामुळे शरीराच्या कार्यक्षमतेवर प्रभाव पडत असल्याचेही त्यांनी सांगितले.