नागपूर : जातीव्यवस्था कायद्याने संपुष्टात आणली आहे. समाजात माणूस म्हणून प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेला आणि संविधानाचा विचार आत्मसात करणारा समाज निर्माण करण्याची जबाबदारी आपल्यावर असल्याचे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
हेही वाचा : साईबाबा प्रकरणात कुणाचे चुकले? काय चुकले?
मारवाडी फाऊंडेशन नागपूरतर्फे देण्यात येणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार कोवई मेडिकल सेंटर आणि हॉस्पिटल कोईम्बतुर येथील हृदय शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वैजनाथ यांना रामदास आठवले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. पाच लाख रुपये रोख, शाल व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
हेही वाचा : नागपूर : दुष्काळ जाहीर न झाल्यास दिवाळीत आंदोलन; नाना पटोले
माजी खासदार अजय संचेती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे कुलपती वेदप्रकाश मिश्रा, सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे हृदय शल्यचिकित्सक डॉ. निकुंज पवार, मारवाडी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, सुधीर बाहेती, महेश बंग, पुनचंद मालू, डॉ. प्रमोद मुंधडा आदी मान्यवर उपस्थित होते. आठवले म्हणाले, आंतरजातीय विवाहाने समाज एकत्र येईल. त्या दृष्टीने मारवाडी समाज प्रयत्न करतो आहे. ही एक परिवर्तनाच्या दृष्टीने होणारी वाटचाल आहे.
अजय संचेती म्हणाले, गेल्या शंभर वर्षांमध्ये वैद्यकीय क्षेत्रात जे होऊ शकले नाही ते आठ दहा वर्षात झाले. आता सुविधा लोकांपर्यंत जायला हवी. यासाठी सरकार आणि समाजाने सोबत काम करायला हवे. समाजाची साथ आल्याशिवाय असे कार्य होऊ शकणार नाही. यावेळी वेदप्रकाश मिश्रा यांचे भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गिरीश गांधी यांनी तर सूत्रसंचालन स्मिता खनगन यांनी केले.देशात वैद्यकीय क्षेत्रात खासगी हॉस्पिटल्स, शैक्षणिक संस्था मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. परंतु, यात कोटा सिस्टम घातक ठरत असून मेरीटनुसारच प्रवेश देणे गरजेचे आहे. आता धार्मिक आणि जातीय समीकरणाच्या पलीकडे जाऊन विचार होणे गरजेचे असल्याचे मत डॉ. प्रकाश वैजनाथ यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केले. पुरस्कार हा माझ्या वाढदिवसाला मिळालेली एक सुंदर भेट असल्याचेही ते म्हणाले.
हेही वाचा : तुरीच्या पिकांत गांजाची शेती; उमरखेडमधून १६ लाखांची झाडे जप्त
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल माझ्या वाक्याचा चुकीचा अर्थ काढून ‘बाबासाहेबांना बुद्ध धम्म स्वीकारायचा नव्हता’ असे वाक्य माझ्या तोंडी टाकण्यात आले. त्यामुळे सर्वत्र माझ्याबद्दल गैरसमज निर्माण करण्यात आला. मी कुठेही जाताना निळा झेंडा मान्य असेल तरच येतो. मी बुद्धीस्ट आहे आणि माझा विरोध करणाऱ्यांनी हा विचार करणे आवश्यक असल्याचे आठवले म्हणाले.