अमरावती : समाज माध्यमांचा वाढता वापर स्वागतार्ह मानला जात असला, तरी या माध्यमांतून चुकीच्या माहितीचा प्रसार करण्याचे प्रकारही वाढत चालले आहेत. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात विविध पदांच्या भरतीची दिशाभूल करणारी जाहिरात समाज माध्यमांवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. वस्तुतः अशा प्रकारे विद्यापीठाकडून कोणत्याही पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध केलेली नसून, युवकांनी अशा दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीला बळी पडू नये, असे आवाहन कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी केले आहे.
हेही वाचा – ताडोबातील वाघांना हवे आता ‘बिसलेरी’चे पाणी, पाणवठ्याकडे मात्र पाठ !
गेल्या दोन दिवसांपासून समाज माध्यमावर संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात अधीक्षक, मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, लेखापाल, सहाय्यक ग्रंथपाल, ग्रंथपाल परिचर, शिपाई/चौकीदार अशा विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्याचे दिसत आहे, मात्र यामुळे अनेक सुशिक्षित बेरोजगार युवक या जाहिरातीला बळी पडून त्याबाबतची विचारणा करीत होते. प्रत्यक्षात संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाकडून अशा प्रकारच्या कोणत्याही पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. जाहिरात प्रसिद्ध करून कोणीतरी खोडसाळपणा व संभ्रम निर्माण केला असून, सुशिक्षित बेरोजगार युवकांनी अशा प्रकारच्या जाहिरातीला बळी पडू नये, असे विद्यापीठाच्या वतीने कळविण्यात आले आहे.