दोन दिवसांपूर्वी बँकेत जात असल्‍याचे सांगून घरून बेपत्‍ता झालेली १९ वर्षीय तरुणी बुधवारी रात्री उशिरा सातारा येथे सापडली. सातारा रेल्‍वे पोलिसांनी या मुलीला गोवा एक्‍स्‍प्रेसमधून ताब्‍यात घेतले. ‘लव्‍ह जिहाद’साठी या तरुणीचे अपहरण करण्‍यात आल्‍याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला होता. त्‍यांनी बुधवारी या मुद्यावर पोलीस ठाण्‍यात गोंधळही घातला होता. या तरुणीला अमरावतीत आणले जात आहे.येथील रुक्मिणी नगरात राहणारी ही तरुणी बेपत्‍ता झाल्‍यानंतर तिच्‍या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. एका विशिष्‍ट समुदायातील युवकाने तरुणीचे अपहरण केल्‍याचा संशय त्‍यांनी व्‍यक्‍त केला होता. पोलिसांनी या प्रकरणात एका संशयित युवकाला ताब्‍यात घेऊन चौकशी सुरू केली होती, पण युवकाने आपण अपहरण केले नसल्‍याचे सांगितले.

हेही वाचा >>> लव्‍ह जिहादवर प्रश्‍नचिन्‍ह; ‘ती’ युवती एकटीच होती प्रवासात; पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी दिली माहिती

हेही वाचा >>> नागपूर : भाजपचा पदाधिकारी रोहित माडेवारला अटक, कर्जाचे आमिष देऊन ४६ लाखांनी केली फसवणूक

बुधवारी खासदार नवनीत राणा यांनी येथील राजापेठ पोलीस ठाण्‍यात धडक दिली आणि बेपत्‍ता तरुणीचा तत्‍काळ शोध घ्‍यावा, अशी मागणी पोलिसांकडे केली. या दरम्‍यान, त्‍यांनी आपले मोबाईलवरील संभाषण पोलीस निरीक्षकांनी ध्‍वनिमुद्रित केल्‍याचा आरोप करीत संताप व्‍यक्‍त केला होता. त्‍यांची पोलीस अधिकाऱ्यांसोबत चांगलीच खडाजंगी झाली होती. त्यामुळे पोलीस ठाण्यातील वातावरण तापले होते.या घटनेची माहिती भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांना समजताच त्यांनी तत्काळ राजापेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. युवतीचा शोध घेण्याची मागणी करीत त्यांनी ठाण्याच्या परिसरात ठिय्या आंदोलनही केले होते.

हेही वाचा >>> खळबळजनक! बनावटी कागदपत्राद्वारे परिचर्या महाविद्यालयाला मंजुरी!

बेपत्ता तरुणीचा शोध घेऊन तिला सुरक्षितरीत्या परत अमरावतीत आणण्याच्या पोलिसांच्या कृतीबद्दल शिवराय कुळकर्णी यांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह आणि पोलीस यंत्रणेचे अभिनंदन केले. या प्रकरणातील तथ्य बाहेर येईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.