बुलढाणा : तब्बल दोन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा अखेर सांगाडाच हाती लागला. त्याची क्रूरपणे हत्या करून मृतदेह शेताच्या बंधाऱ्यात पुरण्यात आल्याचे आढळून आले. हिवरखेड परिसरात हा धक्कादायक घटनाक्रम घडला असून यामुळे खामगाव तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अनैतिक संबंध कधीकधी जीवावर देखील बेतू शकतात आणि पोलिसांनी ठरवले तर ते सुतावरून स्वर्ग गाठू शकतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या घटनेची पार्श्वभूमी तितकीच धक्कादायक आहे. खामगाव तालुक्यातील  हिवरखेड  पोलीस ठाण्यात मागील  १८०ऑक्टोबर २०२२ रोजी  सविता नंदु धंदरे हिने आपला पती नंदू श्रीराम धंदरे ( राहणार गणेशपुर) हा बेपत्ता असल्याची फिर्याद दिली होती. प्रकरणी हिवरखेड पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद करून तपास सुरु  केला होता.

हेही वाचा >>> बाप नव्हे राक्षसच… पत्नी बाहेर जाताच करायचा मुलीवर बलात्कार

असे सापडले मारेकरी

मात्र  बेपत्ता इसमाचा शोध लागत नसल्याने तपास थंड बस्त्यात पडला.  मात्र  नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी नव्याने तपास करण्याचे आदेश देऊन काही निर्देश, सूचना केल्या . तसेच अपर पोलीस अधिक्षक (खामगाव) अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी (खामगाव ) विनोद ठाकरे यांनीही तपासात लक्ष घालून हिवरखेड पोलिसांना वेळोवेळी उपयुक्त  सुचना दिल्या. तब्बल दोन वर्षांपासून बेपत्ता नंदु श्रीराम धंदरे राहणार गणेशपुर, तालुका खामगाव) यांचा नव्याने शोध घेण्यासाठी हिवरखेड पोलीस ठाण्याचे विशेष तपास पथक गठीत करण्यात आले. यामध्ये सहायक पोलीस निरीक्षक कैलास चौधरी, पोलीस हवालदार  विठ्ठल चव्हाण, नायक पोलीस जमादार  प्रविण जाधव, पोलीस जमादार महेंद्र नारखेडे यांचा समावेश होता. तपासासाठी जय्यत पूर्वतयारी करण्यात आली  नंदु धंदरे याचा मोबाईल, सर्व संशयीत लोकांचे मोबाईल क्रमाक,  त्यांचे  ‘लोकेशन’ व माहिती घेण्यात संकलित करण्यात आली . नंदु धंदरे याचे संभाव्य पैश्याचे, जमीनीचे व  प्रेमसंबंधाची माहिती काढण्याकरीता गोपनिय खबरीदार नेमण्यात आले. एवढेच नव्हे तर नंदु धंदरे याचेबद्दल माहिती देण्या-यास दहा हजार रुपयांचे  बक्षिस जाहीर करण्यात आले. गणेशपुर गावासह हिवरखेड पोलीस ठाणे  परीसरात फलक लावण्यात आले होते.

हेही वाचा >>> ५९ वर्षीय वृद्धाचे १७ वर्षीय तरुणीवर जडले एकतर्फी प्रेम, प्रेमापोटी केले असे काही की…

मारेकरी जाळ्यात!

दरम्यान  नेमण्यात आलेल्या गोपनिय खबरीदार कडुन तपास पथकाला महत्वाची आणि निर्णायक ‘टीप’ मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार नंदु धंदरे व अतुल कोकरे  या व्यक्तीचे  एका महिलेसोबत  अनैतिक प्रेमसंबध होते. त्यामुळे त्याचा घातपात झाला असावा व त्याचेबद्दल अतुल कोकरे याचा जिवलग मित्र दिपक शालीग्राम ढोके हाच माहिती देवू शकतो अशी पक्की खबर पथकाला मिळाली.

यानंतर हिवरखेड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने दिपक ढोके व अतुल कोकरे यांच्या हालचालीवर बारकाईने नजर ठेवली. ते कुठे जातात, काय करतात यावर बारकाईने  लक्ष ठेवण्यात आले. खबरींनी दिलेल्या माहितीची पुष्टी झाल्यावर पथकाने संशयित दिपक शालीग्राम ढोके याला उचलले! त्याकडे नंदु श्रीराम धंदरे यांच्याविषयी विचारपुस केली असता त्याने आधी उडवाउडवीची उत्तरे दिली.

मात्र ‘बाजीराव दाखविताच’  दीपक ढोके पोपटासारखा बोलायला लागला. त्याने सांगीतले  की, दोघांचे एकाच महिलेसोबत असलेल्या प्रेम संबंधातून नंदुचा मार्गातून काटा काढण्यात आला. नंदु धंदरे याची हत्या न केल्यास   तो मला (ढोके) आणि अतुल कोकरे संपवून टाकेल  या भीतीपोटी धंदरे याला कायमचे संपविण्याचा डाव या दोघांनी आखला.

अतुल गंगाराम कोकरे (वय३० वर्षे  गणेशपुर) याने मागील १८ ऑक्टोबर २०२२ रोजी  शेतामध्ये फावडा, लाकडी दांडा आणि दगडाने नंदु श्रीराम धंदरे याची निर्घृणपणे हत्या केली. नंतर अतुल कोकरे आणि ढोके या दोघांनी मिळून अतुल कोकरे च्या शेताच्या धुऱ्यावर  धंदरे याचा मृतदेह पुरला. यानंतर मृत धंदरे याची मोटार सायकल मेहकर मार्गावरील  पुलावरुन नदीत फेकुन पुरावा नष्ट केला.

आणि निघाला सांगाडा…

दरम्यान यानंतर आरोपींनी सांगितलेल्या शेताच्या बांधावरील ‘त्या’ ठिकाणी खोदण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे हे  घटनास्थळी हजर राहिले.  शालीग्राम ढोके यांने कोकरे याचेसोबत प्रेत पुरल्याचे ठिकाण तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी प्रदिप जाधव

यांना पंचासमक्ष दाखविले. 

दंडाधिकारी यांनी छायाचित्रणासह समक्ष पंचनामा कारवाई करण्यात आली. यावेळी जमीनीत चार फुट खोलावर मानवी हाडांचा सांगाडा मिळुन आला. तो सांगाडा नंदु श्रीराम धंदरे याचाच असल्याचे साक्षीदार  ढोके याने  सांगीतले. याचदरम्यान आरोपी अतुल गंगाराम कोकरे यास त्याचे गाव गणेशपुर मधून ताब्यात घेण्यात आले.

प्रकरणी  गणेशपूर येथील आरोपी अतूल गंगाराम कोकरे (३०) व दिपक शालीग्राम ढोके वय (२३)  यांचे विरुद्ध नंदु श्रीराम धंदरे याची हत्या आणि करुन संगणमत करुन पुरावा नष्ट केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलीस हवालदार विठ्ठल चव्हाण  यांचे फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. तपास सहायक पोलीस निरीक्षक कैलास चौधरी करीत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Missing man skeleton found after two years in buldhana scm 61 zws