भंडारा : देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय भंडारा जिल्ह्यातील एका घटनेने आला. मोहाडी तालुक्यातील आकाश नावाचा तरुण सहा दिवसांपूर्वी बेपत्ता झाला. त्याचा शोध सुरू असतानाच रविवारी गायमुख यात्रेला गेलेल्या एका भाविकाला तेथील बाहुली विहिरीतून “वाचवा, वाचवा” असा आवाज आला. या आवाजाने भाविक घाबरले आणि त्यांनी ताबडतोब पोलिसांना संपर्क केला. पोलिसांची चमू तात्काळ तेथे पोहोचली. विहिरीत डोकावून पहिले असता त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला.

एक तरुण विहिरीतील एका छोट्याशा झाडाच्या फांदीला धरून जीवाच्या आकांताने जीव वाचवशयासाठी हाक मारत होता. त्याच्या शरीराचा अर्धा भाग पाण्यात बुडालेला होता. जीव वाचविण्यासाठी त्याने त्या फांदीचा आधार घेतला होता. हा तरुण दुसरा तिसरा कुणी नसून सहा दिवसांपूर्वी बेपत्ता झालेला आकाश होता. क्षणाचाही विलंब न लावता पोलिसांनी तात्काळ दोरीच्या साहाय्याने विहिरीत उतरून आकाशला सुखरूप बाहेर काढले. तुमसर उप जिल्हा रुग्णालयात त्याच्यावर उपचार झाले असून सध्या तो घरी आहे.

मोहाडी तालुक्यातील आंधळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गायमुख देवस्थान संकुलात पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका तरुणाचे प्राण वाचले. आकाश बळीराम कायते (२२, रा. पालडोंगरी) असे तरुणाचे नाव आहे. ७ एप्रिलपासून आकाश बेपत्ता होता. पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी अनेक प्रयत्न केले, मात्र आकाशचा कुठेही शोध लागला नाही. शनिवारी आंधळगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सुनील राऊत हे सहकारी पोलिसांसह गायमुख संकुलात अवैध दारूविक्रीवर कारवाई करण्यासाठी गस्तीवर होते.

त्याच वेळी गायमुख येथे दर्शनासाठी आलेले भाविक पार्वती हिवरा जवळील बाहुली विहिरीकडे जात होते. मग विहिरीतून “वाचवा! वाचवा!” असा आवाज त्यांना ऐकू आला. अचानक आलेल्या या आवाजाने भाविक घाबरले आणि त्यांनी तात्काळ पोलीस पथकाला माहिती दिली. त्याच ठिकाणी गस्तीवर असलेले राऊत आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. राऊत यांनी विहिरीत डोकावून पहिले असता आकाश झाडाची फांदी धरून विहिरीत लटकत होता. अर्धा पाण्यात बुडालेला आकाश कायते मोठ्या हिमतीने झाडाच्या फांद्याना धरून स्वतःचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करीत होता.

आकाशला पाहताच पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता दोरीच्या साहाय्याने विहिरीत उतरून आकाशला सुखरूप बाहेर काढले. यानंतर आकाशला तात्काळ तुमसर येथील सुभाषचंद्र बोस रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून हळूहळू सुधारणा होत आहे. या संपूर्ण घटनेत पोलिसांच्या तत्परतेने आणि सतर्कतेमुळे आकाशाचे प्राण वाचले आणि सहा दिवसानंतर आकाश त्याच्या कुटुंबियांना सुखरूप भेटला.

या घटनेबाबत अधिक माहिती घेण्यासाठी आंधळगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सुनील राऊत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आकाशची प्रकृती सध्या स्थिर असून तो सहा दिवस कुठे होता, विहिरीत कसा पडला, सहा दिवस त्याने विहिरीत असे काढले याबाबत आकाशशी बोलण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र सध्या तो उत्तरे देण्याच्या मनःस्थितीत नाही. त्यांच्या शरीरावर थोड्याफार जखमा आहेत. आई वडिलांशी भांडण झाल्यामुळे तो रागाच्या भरात घरातून निघून गेला मात्र पुढे काय झाले हे मला आठवत नाही असे आकाश सांगत आहे.